चाकूर पंचायत समितीअंतर्गत ७१ ग्रामपंचायती आहेत. त्यांचा कारभार ५५ ग्रामसेवकांच्या हाती आहे. त्यापैकी बहुतांश ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत. कोरोनाच्या काळात शासनाच्या आदेशाचे पालन होत नाही. गावागावांतील कार्यक्रम, विवाहामुळे होणारी गर्दी रोखण्यासाठी कोणाचेही नियंत्रण नाही. लिंबाळवाडीत एका कार्यक्रमातून १८८ जणांना कोरोनाची बाधा झाली. एकाचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. जे ग्रामसेवक घरभाडे उचलून मुख्यालयी राहत नाहीत. त्यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हे दाखल करावेत. मुख्यालयी राहत नसलेल्या ग्रामसेवकांकडून घरभाड्याची रक्कम वसूल करावी. ती शासन तिजोरीत जमा करावी. सर्व ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश तात्काळ द्यावेत. जे मुख्यालयी राहत नाहीत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी, ॲड. ओंकार शेटे, दत्ता सूर्यवंशी, नारायण पस्तापुरे, राहुल आरदवाड, तुळशीदास माने, कृष्णा गिरी आदींची नावे आहेत.
मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवकांवर कार्यवाही करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:19 AM