औसा : हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली. त्यामुळे रिमझिम पावसावरच पिके जगली आहेत. त्यातच ३५ दिवसांचा पावसाचा खंड आणि आता पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याने हाताशी आलेले सोयाबीनचे फड जागीच पिवळे पडत असून, वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेंगात दाणे भरत नसल्याने चक्क सोयाबीन उपटून टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली. परिणामी, उत्पादनात घट येणार असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
औसा तालुक्यातील ९२ हजार हेक्टर म्हणजेच एकूण पेऱ्याच्या ९० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. नगदी पैशाचे पीक म्हणून पेरणी करण्यात आलेले सोयाबीन सुरुवातीपासून संकटाच्या चक्रव्यूहात अडकले. यात पिवळा मोझॅकने तर सर्वच नष्ट केले. एकरी १० हजारांचा खर्च करून दुबार पेरणी करणारा शेतकरी आज सोयाबीन उपटून बांधावर टाकताना दिसतोय. मोझॅकमध्ये झाडांची पाने आकाराने लहान होणे, पानांचा काही भाग हिरवट तर काही पिवळसर दिसून येणे, पानांच्या शिरांजवळ पिवळ्या रंगांचे डाग दिसतात. प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते, पाने सुरकत्या पडून ती ओबडधोबड होतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड पिवळे पडतात. अशा झाडांना फुले व शेंगा कमी लागतात. शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत किंवा आकाराने लहान दाणे भरतात. अशा लक्षणाची शेकडो फडे तालुक्यात दिसत असल्याने याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. दरवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांचे या संकटामुळे मोठे नुकसान होणार आहे.
पावसाच्या खंडासह उशिरा पेरणीचा फटका...
औसा तालुक्यात पावसाच्या लहरीपणामुळे पेरणी उशिरा झाली. त्यात पावसाचा ३५ दिवसांचा खंड पडल्याने उष्णता वाढल्याने बुरशीजन्य पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव वाढला. या रोगाची लागण झाल्यास उपायच नसल्याने यात मोठे नुकसान होते. प्रादुर्भावानंतर करण्यात येणारी फवारणी खर्चिक असते; पण त्याचा उपयोग दिसून येतो असे नाही. बाजारात विक्री होणारी सर्वच जुनी वाणे प्रतिबंधक नाहीत, असे रमेश चिल्ले यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांना पिवळा मोझॅक प्रतिबंधक बियाणे देण्याची मागणी महेश पाटील, जगदीश पाटील या शेतकऱ्यांनी केली आहे.