लातूर- शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाहने उभी करण्यासाठी नागरिकांकडे जागाच नाही. नाईलाजास्तव अनेकजण घरासमोर आणि रस्त्यांच्या कडेला दुकानांसमोर वाहने उभी करतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. महापालिकेकडून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र पार्किंगची जागा बांधकाम परवान्याच्या वेळी ठरवून दिली जाते. मात्र, नंतर ही जागाच गायब होते. परिणामी शहराच्या पार्किंगचा प्रश्न अधिक जटिल होत आहे. लातूर शहरात खासगी वाहनांची संख्या वाढू नये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी यासाठी शहरबस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरही खासगी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात एकूण ५ लाख ४३ हजार ५०८ वाहनांची संख्या असून त्यात तब्बल ४ लाख ४ हजार ८८८ दुचाकी आहेत. तर ६० हजार ५३१ चारचाकी वाहने असून ऑटाेरिक्षांची संख्याही २० हजारांच्या घरात आहे. यातील ५० टक्के वाहने शहरात आहेत. शहरी भागात पार्किंगसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे असंख्य वाहनधारक छोट्या गल्ल्यांमधील घरासमोर चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. बाजारात रस्त्यावरच चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. मनपाचे टोईंग व्हॅन असले तरी ते ठरावीक भागातच फिरत असल्याने इतर भागांत वाहनधारकांची मनमानी आहे. रात्री-अपरात्री बिनधास्तपणे रस्त्यावर वाहने लावून झोपल्यामुळे गल्लीतून रुग्ण घेऊन जाता येत नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत. यातून काहींना जीव गमवावा लागला आहे. याकडे यंत्रणा कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुख्य मार्गांवर सर्वाधिक त्रास...
लातूर शहरातील बार्शी रोड, गंजगोलाई, अंबाजोगाई रोड, औसा रोड या मार्गावर काही ठरावीक ठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. रेल्वेलाईनचा समांतर रस्ता अनधिकृत पार्किंगमध्ये अडकला आहे. पाच नंबर चौक ते खाडगाव चौक हॉटेल, ढाब्याच्या पार्किंगने व्यापला आहे. जुना रेणापूर नाका भागात असलेल्या बसस्थानकात बसेस घेऊन जाण्यासाठी चालकांना कसरत करावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हॉटेल व्यावसायिकांचीच पार्किंग आहे. वाहनधारकांना दंड आकारणारी यंत्रणा हॉटेल, इमारत मालकांकडे दुर्लक्षित करते.
- वाहन मालकांवर कारवाई...
रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पध्दतीने वाहन उभे केल्यास वाहतूक पोलिसांकडून कलम १२२ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकदा वाहनेही जप्त केली जातात.
व्हीआयपी मंडळी ज्या रस्त्याने ये-जा करणार आहेत. त्या रस्त्यावर एकही वाहन उभे करू दिले जात नाही. सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांकडून अगोदरच कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून मुख्य रस्त्यांवर दिवसभर कलम १२२ नुसार कारवाई केली जाते.