लातूर: आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण हळूहळू तापताना दिसत आहे. यातच अलीकडे झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील काही समीकरणे बदलताना पाहायला मिळत आहे. भाजपने परभणी शहर आणि जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हेरुन पक्षात घेतले होते. याचा वचपा शिवसेनेने काढला असून, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत लातूर भाजपमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्हा परिषद सदस्य बजरंग भुजंगराव जाधव आणि लातूर जिल्ह्यातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती घेतला. भाजपला लातूरमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपची चिंता वाढली असून, शिवसेनेची ताकद वाढली आहे, असे सांगितले जात आहे.
पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची मुसंडी
राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांमध्ये काँग्रेसने १७, राष्ट्रवादीने १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने ४६ जागा जिंकल्या. तर, भाजपाने २३ जागा जिंकल्या. उर्वरित १६ जागा इतर पक्षांच्या खात्यात गेल्या.
दरम्यान, एकत्रित लढल्यामुळे नुकसान हाेते हे पंढरपूरच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. दरवेळी काँग्रेसच्या सेक्युलर मतांचे जाणीवपूर्वक विभाजन करण्यात आले. प्रत्येकाने हे विभाजन केले. त्यामुळे जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली. त्यामुळे भाजपला पर्याय हा काँग्रेसच असल्याचे त्यांनी सांगितले.