अहमदपूर : दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांनी वीकेण्ड लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रशासनाच्या ढिलाईच्या धोरणामुळे सकाळच्या सत्रात शहरातील काही ठिकाणची दुकाने सुरू होती. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर पहावयास मिळत होते. शनिवारी वीकेण्ड लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने मध्यंतरीच्या काळात जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध शिथिल केले होते. मात्र, राज्य शासनाच्या आदेशानुसार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी वीकेण्ड लॉकडाऊन करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार गत आठवड्यात शहरात शनिवारी व रविवारी प्रतिसाद मिळाला. मात्र, शनिवारी सकाळपासून नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर होते. तसेच शहरातील काही ठिकाणची दुकानेही सुरू होती. वैद्यकीय व कृषी सेवा वगळता अन्य काही दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यापार सुरू ठेवल्याचे पहावयास मिळाले.
दरम्यान, शहरातील ठोक भाजीपाला व्यापार बंद होता. पालिका, महसूल अथवा पोलीस प्रशासनाने दुकाने बंद करण्याविषयी व नागरिकांत जागृती करण्याबद्दल कुठलेही आवाहन केले नाही. तसेच सक्तीही केली नाही. त्यामुळे बहुतांश दुकाने दुपारपर्यंत सुरू होती. रस्त्यावर रहदारीही मोठ्या प्रमाणावर होती. सकाळच्या सत्रात ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी शहरातील मुख्य चौकात दुकाने थाटली होती.
बैठकीत घेतला होता निर्णय...
प्रशासन व व्यापाऱ्यांसोबत बंदविषयी बैठक घेऊन कडेकोट बंद करण्याविषयी सूचना केल्या होत्या. तेव्हा व्यापाऱ्यांनी स्वतः बंद ठेवणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रशासनाने सक्ती केली नसल्याचे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांनी सांगितले.
कृषी सेवा केंद्र बंदचे आदेश...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कृषी दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्याच्या सूचना असतानाही प्रशासनाने बैठक घेऊन कृषी दुकाने शनिवार व रविवारी बंद ठेवण्याची तोंडी सूचना केली. मात्र, सध्या कीटकनाशक, औषधे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतकऱ्यांना अडचण येणार असल्याचे व्यापारी विनोद भुतडा यांनी सांगितले.
पालिकेकडून कारवाई...
सकाळच्या सत्रात काही दुकाने सुरू असल्याची माहिती मिळताच पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तीन आस्थापनांवर कारवाई केली आहे, असे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.
नागरिकांनी स्वतः बंद पाळावा...
मागील सहा महिन्यांपासून आपण लॉकडाऊन व बंदविषयी प्रत्येकांना वेळोवेळी सूचना करीत आहोत. नागरिकांनी आताही स्वतःहून कोरोना व बंदचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी केले.