- बालाजी कटके
रेणापूर (लातूर ): शाळेला जातो म्हणून २४ डिसेंबर २०१६ रोजी घराबाहेर पडलेला रेणापुरातील फय्याजोद्दीन ताजोद्दीन अत्तार (११ वर्षे) हा गायब झाला होता़ पालकांनी शोध घेतला़ परंतु, तो सापडला नाही़ सुदैवाने शेळ्या चारताना झालेल्या परिचयातून त्याचा ठावठिकाणा लागला आणि पोलिसांनी त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून आणून पालकांच्या ताब्यात दिले़ मुलाला पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू ओसंडू लागले.
रेणापूरच्या संजयनगर भागातील ताजोद्दीन इसाक आत्तार यांचा मुलगा फयजोद्दीन (११) हा येथील उर्दु शाळेत शिकत होतो़ २४ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी शाळेला जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला़ परंतु, तो आलाच नाही़ त्यामुळे पालकांनी शोध घेऊनही सापडला नसल्याने वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली़ दरम्यान, नातेवाईकांकडे चौकशी केली़ परंतु, शोध लागला नाही़
दरम्यान, फय्याजोद्दीन हा लातूर- पंढरपूर- मिरज रेल्वेने मिरजला पोहोचला़ तिथे तो १८ महिने फिरत होता़ त्याच कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा तालुक्यातील दत्तवाडीतील मारुती चन्नापा पुजारी हे आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले होते़ देवदर्शनानंतर ते गावाकडे जाण्यासाठी मिरजला आले असता फय्याजोद्दीन हा मला कोणीही नाही, जेवण द्या, असे म्हणत गयावया करु लागला़ त्यांनी त्याला आपल्यासोबत दत्तवाडीस घेऊन गेले़ २४ जुलै २०१८ पासून तो पुजारी यांच्याकडे राहू लागला़ एके दिवशी पुजारी यांच्यासोबत शेळ्या चारण्यासाठी तोही गेला असता गावातील मुस्लीम समाजातील फेरोज डफेदार याने त्याची कसून चौकशी केली़ तेव्हा त्याने आपणास आई- वडिल नाहीत़ आपण लातूरहून आलो असल्याचे सांगून नाव सांगितले़
यानंतर फेरोज याने पोलीस पाटीलांना ही माहिती दिली़ त्यावरुन त्यांनी कुरुदंवाड पोलीस ठाण्यास ही माहिती देऊन घटना सांगितली़ पोलिसांनी खात्री करुन घेतली़ त्यानंतर लातूर पोलिसांशी संपर्क साधला़ तेव्हा रेणापूरहून बेपत्ता झालेला मुलगा फय्याजोद्दीन असल्याचे निष्पन्न झाले़ रेणापूरचे पोनि गोरक दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बालाजी डप्पडवाड यांनी त्याच्या नातेवाईकांना सोबत घेऊन फय्याजोद्दीनला २५ आॅगस्ट आणले आणि पालकांच्या स्वाधीन केले़
फय्याज सुखरुप आला़फय्याजला पाहून आई- वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते़ आपल्या आई- वडिलांना पाहून फय्याजनेही कडाडून मिठी मारली़ फय्याजोद्दीन सापडला असला तरी तो पळून गेला होता की? त्याचे अपहरण करण्यात आले होते, हे अद्यापही उलगडले नाही़