औसा : मागील ३० ते ३५ वर्षांपासून औसा-भादा राज्यमार्गावर दुतर्फा अतिक्रमणधारकांनी विळखा घातला होता. परिणामी १०० फुटांचा राज्यमार्ग २० फुटांवरच आल्याने सतत रहदारीस अडचण निर्माण होत होती. मात्र, आता जनतेकडून होणाऱ्या मागणीनंतर शुक्रवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. आज हनुमान मंदिर परिसर ते भादा रस्त्यावरील सार्वजनिक स्मशानभूमीपर्यंतच्या ३५० मीटरवरील दुतर्फा अतिक्रमण काढण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
या मार्गावरील अतिक्रमण हटविल्याने ६० फुटांचा रस्ता खुला करण्यात आला. आणखीन ४० फूट रस्ता रेकॉर्ड पाहून खुला करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रोहन जाधव यांनी सांगितले. औसा टी पाॅइंट ते भादा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बेसुमार अतिक्रमण वाढले आहे. गटारी बंद करुन त्यावर दुकाने, घरे बांधल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. अनेकदा निवेदने देण्यात आली. त्यानुसार प्रयत्नांना यश आले असून, रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. या मोहीमेत सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका, पोलिस प्रशासनाच्या विशेष सहकार्याने संपूर्ण रस्ता खुला करण्यात येत आहे. यावेळी शाखा अभियंता दिलीप हणमंते, डी.डी. साठे, बी.डी. शिंदे, सहायक स्थापत्य अभियंता मन्सूर पठाण, उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक सुनील रजितवाड, प्रशांत लोढे आदींसह पोलिसांचा बंदोबस्त होता.
अतिक्रमणमुक्त झालेल्या रस्त्याचे काम चालू...हनुमान मंदिर ते भादा रोडवरील स्मशानभूमी पर्यंतच्या ३५० मीटर अतिक्रमणमुक्त झालेल्या रस्त्याचे नव्याने काम त्वरित चालू होणार आहे. दुतर्फा गटारीसह सिमेंट काँक्रीटचा मजबूत रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी २ कोटींचा निधी मंजूर असून, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोमवारपासून रस्त्याचे काम प्रगतिपथावर असेल, असे शाखा अभियंता दिलीप हणमंते यांनी सांगितले.