लातूर : चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा २० किलाेमीटरचा पाठलाग करून विदेशी दारू पकडली. यावेळी एकाला कारसह अटक केली असून, त्याच्याकडून १ लाख १७ हजार रुपये किमतीची दारू आणि ४ लाख रुपयांची कार असा एकूण ५ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उदगीर ते घाेणसी महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली आहे.
लातूर जिल्ह्यात माेठ्या प्रमाणावर चाेरट्या मार्गाने अवैध हातभट्टी, देशी-विदेशी दारूची वाहतूक आणि विक्री हाेत असल्याची माहिती समाेर आली आहे. दरम्यान, एका कारमधून (एम.एच. १२ जी.आर. ५१६०) विदेशी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिली हाेते. संशयास्पद वाटणाऱ्या कारचा पथकाने उदगीर येथून घाेणसीपर्यंत पाठलाग करत कारसह विदेशी दारू पकडली.
यावेळी तानाजी श्यामराव ढाेबळे (वय ४५ रा. रेतू उमरगा, ता. जळकाेट) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल ५ लाख १७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उदगीर येथील निरीक्षक आर. एम. चाटे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, जवान संताेष केंद्रे यांनी केली.