राजकुमार जाेंधळे / औसा (जि. लातूर) : तालुक्यातील तुंगी येथे एकाने अज्ञात महिलेची हत्या करून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातच तिच्या मृतदेहाचे नऊ तुकडे करून ताे अर्धवट जाळला. तीन पाेत्यांत भरून ते काेरड्या विहिरीत टाकले. ही घटना शुक्रवारी समाेर आली आहे. याबाबत औसा पाेलिस ठाण्यात एकाविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, एका अज्ञात महिलेची हत्या करून, तिच्या मृतदेहाचे तुकडे करत ते जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अर्धवट जळाल्याने ते विहिरीत टाकून दिले. पाेत्यातून दुर्गंधी येत असल्याने, या खुनाचे बिंग फुटले. याबाबतची माहिती गावकऱ्यांनी औसा पाेलिसांना दिली. माहितीनंतर तातडीने पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विहिरीतील ते पाेते बाहेर काढून पाहिले असता, महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचे आढळून आले. शरद (वय ३५) नामक व्यक्ती हा गाव सोडून बाहेरगावी राहत होता. दरम्यान, तीन-चार महिन्यांनी तो गावाकडे येत हाेता. ११ मे रोजी सकाळी प्लास्टिकचे पोते खांद्यावर नेताना ताे गावकऱ्यांच्या नजरेला पडला. गावामध्ये दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाली. शरद याने गावानजीकच्या विहिरीत काहीतरी टाकल्याची चर्चा हाेती. पोलिस पाटील शरद कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.
घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी, पोलिस निरीक्षक शंकर पटवारी, नितीन गायकवाड, गजानन बिराजदार, दिनेश गवळी, रामकृष्ण गुट्टे, मुबाज सय्यद यांनी भेट देऊन पाहणी केली.
घरात रक्त, बांगड्या, अर्धवट जळालेले कपडे...
आरोपीने अज्ञात महिलेची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे घरातच तुकडे केले. यानंतर घराच्या पाठीमागे ते जाळले. यामुळे घटनास्थळी रक्त, तुटलेल्या बांगड्या, अर्धवट जळालेली लाकडे, कपडे, दगड आढळून आले आहेत.
विहिरीनजीकच केले अंत्यसंस्कार...
अज्ञात महिलेच्या शरीराच्या तुकड्यांचे जागीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून, गावठाणमधील विहिरीनजीकच पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष उपस्थित हाेते.