शिरूर अनंतपाळ (लातूर ) : तालुक्यातील तळेगाव (बो ) येथील एका शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने 'मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर ' या सदराखाली 'लोकमत' ने सविस्तर वृत्ताकंन केले होते .त्या वृत्ताची थेट राज्याच्या कृषीराज्यमंत्र्यानी दखल घेतली असुन, त्या शेतकऱ्याचा हरभरा तत्काळ खरेदी करण्याच्या सुचना जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास दिल्या. त्यामुळे अखेर त्या शेतकऱ्याचा १५० क्विंटल हरभरा आज खरेदी करण्यात आला आहे .परिणामी त्याच्या मुलीच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला असल्याने या शेतकरी कुटूंबाने 'लोकमत'चे आभार व्यक्त केले आहेत .
तालुक्यातील तळेगाव( बो ) येथील भागवत एकुर्गे या शेतकऱ्यास यंदाच्या रबी हंगामात एकत्र कुटूंबातील ५ हेक्टर्स ५० आर जमीनीत जवळपास २०० कट्टे हरभरे झाले . हरभऱ्याची हमीभावात विक्री करून मुलीचा विवाह पार पाडता येईल, या विचाराने त्यानी हरभऱ्याची विक्रीसाठी आँनलाईन नोंदणी केली आणि मुलीच्या विवाहाची २४ एप्रील ही तारीख काढली होती .परंतु हरभऱ्याची विक्री झालीच नाही त्यामुळे भागवत एकुर्गे याना आपल्या मुलीच्या विवाहाची तारीख बदलुुन १२ मे काढावी लागली .याबाबत लोकमतने सविस्तर वृत्ताकंन करून शेतकऱ्याची व्यथा मांडली होती . त्या वृत्ताची दखल थेट राज्याचे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतली. रयत क्रांती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल मोरे ,जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे यांच्या माध्यमातुन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यास सदरील शेतकऱ्याचा हरभरा तात्काळ हमीभावाने खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे भागवत एकुर्गे यांचा एकंदर १५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या विवाहाचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकमतने सर्व प्रथम या शेतकऱ्याची व्यथा मांडल्याने एकुर्गे कुटूंबाने लोकमतचे आभार मानले आहेत.
आता तारीख बदलणार नाही याबाबत हरभरा उत्पादक शेतकरी भागवत एकुर्गे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले गुरूवारी हरभऱ्याची हमीभावात खरेदी करण्यात आली आहे .त्यामुळे लवकरच हरभऱ्याचे बील जमा होईल .त्यामुळे आता विवाहाची तारीख बदलण्याची गरज पडणार नाही . लोकमतच्या वृत्तामुळे आपल्याला न्याय मिळाल्याची भावनाही एकुर्गे यानी यावेळी व्यक्त केली आहे