- महेश पाळणे लातूर : मल्लखांब योगासह जिम्नॅस्टिक खेळात आपल्या कौशल्याने किमया करणाऱ्या प्रशिक्षिका आशा झुंजे-भुसनुरे यांनी खेळानंतरही प्रशिक्षणाच्या माध्यमातून छाप पाडत आपली लय कायम ठेवली आहे. मंगोलीया येथे होणाऱ्या आठव्या जुनिअर व सिनिअर एशियन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांची निवड झाली असून, या खेळात लातूरचे नैपुन्य पुन्हा सिद्ध झाले आहे. लातूरची जिम्नॅस्ट सुषमा शिंदे हिची भारतीय वरिष्ठ संघात नुकतीच निवड झाली आहे. पाठोपाठ तिची गुरू असलेल्या आशा भुसनुरे यांचीही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याने लातूरच्या जिम्नॅस्टिकमध्ये दुग्ध शर्करा योग साधला गेला आहे.
लातूरच्या रूद्र स्पोर्टसच्या माध्यमातून गुरू शिष्याचीजोडी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविणार आहे. १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एशियन चॅम्पियन स्पर्धेसाठी गुरू शिष्याची ही जोडी भारतीय संधाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यामुळे जिम्नॅस्टिक खेळातही लातूरचे प्रशिक्षक तथा खेळाडू पुढे जात आहेत.
राज्याला मिळवून दिले सुवर्णपदक...आशा भुसनुरे यांनी बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुवर्णपदक मिळवून दिले होते. जिल्ह्याचा गुणवंत खेळाडू पुरस्कार त्यांना यापूर्वी मिळाल आहे. यासह अनेकवेळा राष्ट्रीय व आंतरविद्यापीठ स्पर्धेत मल्लखांब, योगासह जिम्नॅस्टिक खेळात त्यांनी खेळाडू म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले असून, त्यातील बऱ्याच खेळाडूंनी पदकही मिळविले आहेत.
क्रीडामंत्र्याची साद...जिम्नॅस्ट सुषमा शिंदे व प्रशिक्षिका आशा भुसनुरे यांच्या निवडीबद्दल क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी दोघींचाही यथोचित सत्कार केला. यासह मंगोलिया येथील स्पर्धेसाठी आर्थिक साह्य करण्याचेही आश्वासनही त्यांनी दिले. या दोन्ही खेळाडूंना सर्वोतोपरी सहाय्य करण्याच्या सूचनाही प्रशासनाला त्यांनी दिल्या. त्यामुळे या खेळाडूंना क्रीडामंत्र्यांनी प्रोत्साहित करत साद दिली आहे.