- आशपाक पठाण
लातूर : राज्यात परवानाधारक ऑटोरिक्षांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून यावर्षी २० वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षा भंगारात जाणार आहेत. यासंदर्भात राज्य परिवहन प्राधिकरणने निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी जिल्हास्तरावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात येणार आहेत.
२० वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षांची नोंदणीच केली जाणार नसल्याने मुदत संपलेली वाहने तोडण्याची वेळ येणार आहे. खटुआ समितीने राज्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सीचे भाडेदर वाढ करण्याबाबत शासनास नुकताच अहवाल सादर केला आहे. याच अहवालात ऑटोरिक्षांची वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली असून मुंबई वगळता इतर भागात परवानाधारक ऑटोरिक्षांची वयोमर्यादा यावर्षी २० वर्षे ठेवण्यात आली आहे. पुढील पाच वर्षात यात घट केली आहे. २०२४ मध्ये १५ वर्षे वयोमान ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात राज्यभरातील हजारो ऑटोरिक्षा भंगारात जाणार आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊनमधील मुदत संपलेल्या परवान्यांचे नुतणीकरण, मंजुरीपत्र, बदली वाहन, इरादापत्राची वैधता वाढवून देण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात परवनाधारकांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील यांनी सांगितले. ऑटोरिक्षांची वयोमर्यादा २०२१ मध्ये २०, २०२२ पर्यंत १८, २०२३ पर्यंत १६ तर २०२४ मध्ये केवळ १५ वर्षे करण्यात आली आहेत.
लातूरमध्ये ८ हजार परवानाधारक...लातूर जिल्ह्यात जवळपास ८ हजार परवानाधारक रिक्षा आहेत. सध्या मागणीनुसार ऑटोरिक्षा परवाना दिला जात असून २० वर्षे पूर्ण झालेली वाहनांना आता यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले. २०२१ मध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या परवानाधारक ऑटाेरिक्षांची संख्या लातूरमध्ये फारसी नसली तरी २०२४ मध्ये मात्र ५०० हून अधिक ऑटोरिक्षांची मुदत संपणार असल्याचे सांगण्यात आले.