लातूर : शहरातील विविध मार्गांवर उभारण्यात येत असलेल्या युनिक पाेलविराेधात लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने लातूर शहर महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर आंदाेलन करण्यात आले. यावेळी आयुक्तांना युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
लातूर शहरात ठिकठिकाणी युनिक पाेल बसवण्यात आले आहे. काही युनिक पाेल बसविण्यासाठी खड्ड्यांचे काम सुरू आहे. हे युनिक पाेल चुकीच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत, यातून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. युनिक पाेल रस्त्यावरच असल्याने वाहन चालविताना जाहिरात बघताना लक्ष विचलित हाेत आहे. यातून अपघाताच्या घटना घडत आहेत. रस्त्याच्या मधाेमध हे पाेल उभारण्यात आल्याने अंगावर पडेल की काय? अशी भीती आता वाहनधारक, नागरिकांना वाटत आहे. हे युनिक पाेल हटविण्यात यावेत, या मागणीसाठी लातूर मनपाच्या प्रवेशद्वारासमाेर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी आंदाेलन करण्यात आले. निवेदनावर युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इमाम जब्बार सय्यद यांची स्वाक्षरी आहे.