लातूर : २०२२-२३ ची संचमान्यता ऑनलाईन पोर्टलवरील विद्यार्थी पटसंख्येनुसार त्वरीत द्यावी, ६ फेब्रुवारी २०२३ च्या प्रत्यक्ष अनुदान देय असल्याचे आदेश त्वरीत द्यावेत, ३१ मार्चपुर्वी वेतन अदा करावयाची कार्यवाही सुरु करावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ, प्रदेश शिक्षक काँग्रेस व राज्य उर्दू शिक्षक संघटनांच्या वतीने सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन सुरु करण्यात आले आहे.शासनाने ६ फेब्रुवारी रोजी शाळा, वर्ग तुकड्या, त्रुटी पुर्तता केलेल्या शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा घोषित करुन अनुदान मंजूर केले. परंतू, नवीनतम संचमान्यता आणि संच मान्यतेमध्ये आधार क्रमांकाची पडताळणी ही जाचक अट टाकली आहे त्यामुळे ही अट रद्द करुन सहा महिन्यांची मुदत द्यावी, विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करावेत, संच मान्यता, दुरुस्तीसाठी असलेली अव्यवस्थेची नैतिक जबाबदारी स्विकारावी, २० मार्चच्या निर्णयानुसार अनुदानास पात्र शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ठ करण्यासाठी अधिकाराचा अंमल करावा, ३१ मार्चपुर्वी वेतन अदा करावयाची कार्यवाही करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लक्षवेधी आंदोलन सुरुच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन हाके, ज्ञानेश्वर मोरे, शिवाजी विळेगावे, शिक्षक प्रतिनिधी सभेचे कालिदास माने, शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, धनंजय शेळके, फजल काझी, महादउेव सोनवणे, सुर्यकांत चव्हाण, दिलदार पठाण, वहीद शेख, अझहर सय्यद, लियाकत अली, दत्तात्रय गोकुळे, डी.व्ही. येरनाळे, गोविंद शिंदे, माजीद शेख, मुजाहीद खान आदींसह शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, शिक्षक सहभागी होते.