अहमदपूर : तालुक्यातील चवंडा नगर व इतर भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजेनअंतर्गत तिसरा, चौथा आणि पाचवा हप्ता वर्षभरापासून मिळाला नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत़. त्यामुळे थकित हप्ते देण्यात यावेत, यासह इतर मागण्यांसाठी नगरसेवक सरवरलाल सय्यद, अभय मिरकले यांनी पालिकेसमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले़.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला़. त्यामुळे बहुतांश लाभार्थ्यांनी कर्ज, ऊसनवारी करुन घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले़. परंतु त्यानंतरचे उर्वरित तीन हप्ते वर्षभरापासून मिळाले नाहीत़. त्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़. थकित हप्ते देण्यात यावेत, या मागणीसाठी नगरसेवक सरवरलाल सय्यद, अभय मिरकले यांनी पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे़.
आ. बाबासाहेब पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली़ आणि लवकरच मागण्या सोडविण्यात येतील, असे पत्र आंदोलनकर्त्यांना पालिकेच्या वतीने दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, नगरसेवक सरवरलाल सय्यद, अभय मिरकले, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास महाजन, नगरसेवक राहुल शिवपुजे, नगरसेवक ताजोद्दीन सय्यद, चंद्रकांत पुणे, प्रशांत भोसले, जावेद बागवान, सुनील डावरे, सादिक चाऊस, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे आदींची उपस्थिती होती.