संदीप शिंदे, लातूर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ उदगीर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी सकाळी निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच तगरखेडा येथील नागरिकांनी लातूर-जहिराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तर औसा तालुक्यातील किल्लारी आणि लातूर तालुक्यातील तांदुळजा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
उदगीर शहरात रविवारी सकाळी १० वाजता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काळे झेंडे घेऊन राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. सुमारे दोन तास छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी शहर व परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांना या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलकांवर झालेला हल्ला हा निंदनीय असून, शासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आंदोलनावर लाठीचार्ज करणारे पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निलंबित करावे, एसआयटी नेमून सखोल चौकशी करावी, अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्यासह आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे परत घ्यावेत यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
तसेच मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटूरे, माजी आ. शिवराज तोंडचिरकर, कल्याणराव पाटील, बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, राष्ट्रवादीचे प्रा. शिवाजीराव मुळे, रिपाईचे देविदास कांबळे, मंजूरखान पठाण, बाळासाहेब पाटोदे, भरत चामले, चंद्रकांत टेंगेटोल, समीर शेख, धनाजी मुळे, प्रा. श्याम डावळे, महेबूब शेख, कमलाकर भंडे, फयास डांगे, दिपाली औटे, नागेश पटवारी, सचिन साबणे, बाबासाहेब सूर्यवंशी, पृथ्वीराज पाटील, सनाउल्ला खान, सतीश पाटील मानकीकर, प्रशांत जगताप, बिपिन पाटील, मदन पाटील, अजित पाटील, रामभाऊ हाडोळे, छावाचे दत्ता पाटील, डॉ. गजानन टिपराळे, गोपाळ पाटील, सतीश काळे, अंकुश ताटपल्ले, राहुल आतनुरे, विवेक सुकणे, राजकुमार माने, अहमद सरवर, कमलाकर फुले, सिद्धेश्वर लांडगे, विकास बंडे, नरसिंग मोरे, प्रदीप बिरादार, प्रमोद काळोजी, सुनील ढगे, निखील माने आदीसह नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, शहर पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
औसा तालुक्यातील किल्लारी येथे जालना जिल्ह्यातील घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच किल्लारी येथील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच लातूर-उमरगा महामार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त करीत राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी माजी सभापती किशोर जाधव, भाजपाचे प्रकाश पाटील, चंदु पाटील, किशोर भोसले, सुरज बाबळसुरे, ज्योतीराम भोसले, गणेश बाबळसुरे, पवन भोसले, मनोज भोसले आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
लातूर तालुक्यातील तांदुळजा येथे जालना जिल्ह्यातील घटनेच्या निषेधार्थ रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला. यामध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार उद्धवराव पाटील, नानासाहेब जाधवर, महेश पवार यांनी बंदोबस्त ठेवला.
औराद शहाजानी येथे सोमवारी बंद...
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेचा औराद शहाजानी येथे निषेध करण्यात आला असून, सकल मराठा समाजाने सोमवारी औराद शहाजानी बंदची हाक दिली आहे. दरम्यान, रविवारी निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच लातूर-जहिराबाद महामार्गावर रविवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मदन बिरादार, लक्ष्मण कांबळे, नागेश राघो, अखिल मत्तिशे, गणेश शेटकार, ब्रह्मानंद बिरादार, अजय डावरगावे, प्रशांत बिरादार, शिवाजी थेटे, हरी निरमनाळे, प्रशांत गुत्ते, राहुल डावरगावे, विशाल बिरादार, गजानन येरोळे, मुकेश मुळजे, विजयकुमार मठपती, रणजित सूर्यवंशी, प्रमोद निरमनाळे आदींसह ग्रामस्थांनी यात सहभाग नोंदविला.