लातूर : किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगाम चालू व्हावा, यासाठी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीने किल्लारी पाटी येथे मंगळवारी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी आ. कॉ. माणिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अवसायक मंडळ व राज्य बँकेची हकालपट्टी करून शेतकरी व कामगार कारखाना ताब्यात घेतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
कारखाना बचाव समितीने मंगळवारी किल्लारी पाटी येथे कारखान्याच्या गेटसमोर रास्ता रोको करून बाजारपेठ बंद ठेवली. राज्य शासन, राज्य बँक, अवसायक मंडळाचा तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. शेतकरी, कामगार, व्यापारी व नागरिकांनी या आंदोलनात असंतोष प्रकट केला. औसा, निलंगा, उमरगा येथील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी माजी आ. कॉ. माणिक जाधव, प्रकाश पाटील, गुंडाप्पा बिराजदार, नानाराव भोसले, गुलाब धानुरे, डॉ. शंकर परसाळगे, विजयकुमार सोनवणे यांची भाषणे झाली.
कारखाना बँकेचे देणे नाही. उलट कारखान्याचे ७ कोटी येणे आहे. २० हजार सभासदांचे शेअर्स जमा आहेत. १४ कोटी शासनाची कर्जाची थकबाकी आहे. सध्या कारखान्याकडे २० कोटी भांडवल आहे. टेंडर सुटून तीन महिने झाले, तरी कारखाना सुरू होत नाही. टेंडर रद्द करून कारखाना आमच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी कारखाना बचाव समितीच्या पदाधिकाºयांनी यावेळी केली. उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते. परंतु, शेतकºयांचा असलेला किल्लारी कारखाना चालू केला जात नाही. मुख्यमंत्र्यांनी ३० सप्टेंबर रोजी जाहीर सभेत कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, कारखाना सुरू झाला नाही. कारखाना चांगल्या स्थितीत असताना राजकीय डावपेच आखून शासन कारखान्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे यावेळी माजी आ. कॉ.जाधव, विजयकुमार सोनवणे म्हणाले.
अवसायक, राज्य बँकेने चालते व्हावे...कारखाना शेतकºयांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. परंतु, तो अजून बँकेच्या ताब्यात आहे. ३० जानेवारीपर्यंत कारखाना मुक्त करून, अवसायकांनी तसेच राज्य बँकेच्या कर्मचाºयांनी आपले गबाळ घेऊन निघून जावे. अन्यथा १ फेब्रुवारी रोजी शेतकरी, नागरिक हजारोंच्या संख्येने जाऊन कारखाना ताब्यात घेतील व स्वत:च्या हिंमतीवर चालवतील, असेही यावेळी जाधव म्हणाले.