लातूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी लातूर शहरातील मुस्लिम समाजातील तरूणांनी महात्मा गांधी चौकात सोमवारी दुपारी निदर्शने केली. मराठा समाजाबरोबर मुस्लिम समाजालाही शिक्षण, नोकरीत आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
मराठा क्रांती माेर्चाच्या पुढाकारातून लातूर तहसील कार्यालयासमोर आदित्य देशमुख देशमुख यांनी आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मुस्लिम समजातील तरूणांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. न्या.राजेंद्र सच्चर व डॉ. महेमदुर्ररहमान यांच्या कमिटीने केलेल्या शिफारशी लागू कराव्यात. केंद्र व राज्य शासनाने मुस्लिम आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. याप्रसंगी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे मोहसीन खान, उस्मान शेख, ॲड. फारूख शेख, इम्रान सय्यद, इरफान शेख, जावेद मणियार, अफजल खान, डॉ. मुश्ताक सय्यद, जफर शेख, गौस सय्यद, अजीज बागवान, अर्शद खान, इस्माईल फुलारी, यूनूस पटेल, शादुल शेख, वाजीद मणियार, जावेद बागवान, मन्सूर खान यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.