रेणापूर (लातूर ) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शहरातील मराठा समाज बांधवांच्या वतीने शनिवारी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले़ या आंदोलनास व्यापाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती़
मराठा समाजास आरक्षण देण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, या मागणीसाठी परळी येथे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे़ या आंदोलनास शहरातील मराठा समाज बांधवांनी पाठिंबा दर्शवित रेणापूर शहर बंदचे आवाहन केले होते़ त्या आवाहनास शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवित शनिवारी दिवसभर आपली दुकाने बंद ठेवली होती़ त्यामुळे सकाळी १० ते दुपारी ४ वा़ पर्यंत शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती़ प्रारंभी सकाळी समाज बांधवांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले होते़ दरम्यान, या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी बंदोबस्त ठेवला होता़