लातूर : शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असलेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचा कारभार प्रभारींवर असल्याने त्याचा परिणाम बळीराजावर पडत आहे. रबी हंगामातील ज्वारीचा विमा उतरविण्याची मुदत संपली आहे तर हरभरा, गव्हाचा विमा काढण्यासाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. पीकविमा जनजागृतीची कृषी विभागाला आता जाग आल्याने शुक्रवारपासून १० वाहनांद्वारे प्रचारास सुरुवात केली आहे. कृषीचा हा कारभार म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची चर्चा होत आहे.
कुठलीही नैसर्गिक आपत्ती येऊन शेती पिकांचे नुकसान झाल्यास सदरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे खरीप आणि रबी या दोन्ही हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची नेहमीच लक्ष असते. दरम्यान, यंदा राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा काढण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांचा आणखीन ओढा वाढला आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसाठी १ नोव्हेंबरपासून पीकविमा भरण्यास सुरुवात करण्यात आली. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात ऑनलाईन प्रस्ताव दाखल करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने ज्वारीसाठी ५ डिसेंबरपर्यंत तर हरभरा, गव्हासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तेव्हा कृषी विभागाकडून १० वाहनांद्वारे जिल्ह्यात पीकविम्यासंदर्भात जनजागृती करण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सव्वातीन लाख हेक्टरवर पेरा...जिल्ह्यात रबीचे सरासरी क्षेत्र ३ लाख १७ हजार २३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ३ लाख २२ हजार २५४ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा झाला असून तो २ लाख ६४ हजार ४४३ हेक्टरवर झाला आहे. त्यापाठोपाठ ज्वारीचा ३१ हजार ३४४ हेक्टरवर पेरा झाला आहे. तसेच गव्हाचा केवळ ८ हजार ५९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा...पीक - पेरणीज्वारी - ३१३४४गहू - ८५९३मका - १५५३हरभरा - २६४४४३करडई - १५६४२जवस - ७९सूर्यफुल - ३९
सात महिन्यांपासून प्रभारीराज...जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांची मे अखेरीस बदली झाली. तेव्हापासून या पदाचा कारभार प्रभारींवर सुरु आहे. त्यामुळे प्रभारींसह काही कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे. सध्याचे प्रभारी हे प्रशिक्षणासाठी अन्यत्र गेल्याने कृषी उपसंचालकांवर पदभार सोपविण्यात आला आहे. सात महिन्यांपासून नियमित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामाेरे जावे लागत आहे.
१५ डिसेंबरपर्यंत पीकविम्याची मुदत...ज्वारीसाठीचा विमा काढण्याची मुदत संपली आहे. हरभरा आणि गहू पिकांचा विमा काढण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एक रुपयांत पीकविमा काढण्याचे बहुतांश शेतकऱ्यांना माहिती आहे. प्रचार, प्रसिध्दीसाठी पीकविमा कंपनीकडून काल १० वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.- महेश क्षीरसागर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.