निलंगा : अपघातात डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या एका मित्राच्या उपचारासाठी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अन्य वर्गमित्र जीवाचे रान करीत आहेत. या वर्गमित्रांनी शहरातून मदतफेरी काढून अडीच लाख जमा केले. ही रक्कम आईच्या हातात सूपुर्द करुन आमचा मित्र लवकरच बरा होईल आणि पुन्हा कॉलेजला येईल, असा विश्वास व्यक्त केला.
शहरातील महाराष्ट्र महाविद्यालयातील बी. कॉम द्वितीय वर्षातील अमोल गणपत वाघमारे याचे परीक्षेचे हॉल तिकीट विसरले होते. त्यामुळे ते घेऊन येताना त्यास २३ ऑगस्ट रोजी दुपारी एका दुचाकीने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी होऊन मेंदूला सूज आली. त्याला लातूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची घरची परिस्थिती खूप हलाखीची असून कुटुंब अल्पभूधारक आहे. एक लहान भाऊ असून आई घरकाम करते. अमोल हा शिक्षण घेत लाईट फिटिंगचे काम करीत आहे.
रुग्णालयाचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे त्याच्या महाविद्यालयातील मित्रांनी एकत्र येऊन मदत निधी जमा केला. तसेच शहरातून मदतफेरी काढून अडीच लाख रुपये जमा केली. ही रक्कम अमोलच्या आईच्या स्वाधीन केली.
दवाखान्यात उपचार घेत असलेला अमोल बरा होऊन पुन्हा वर्गात येईल, या अपेक्षेने वृंदावन घायाळ, शायरान ढगे, संतोष जाधव, आकाश पोतदार, मयुरी लाटे, एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी मदत निधी जमा केली. ही मदत प्राचार्य डॉ. एम.एन. कोलपुके, उपप्राचार्य प्रशांत गायकवाड यांच्याकडे स्वाधीन केली. महाविद्यालयाने सदरील रक्कम आईच्या स्वाधीन केली. मित्रांनी केलेल्या या मदतीचे कौतुक संस्थाध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, प्राचार्य डॉ. एम.एन.कोलपुके, उपप्राचार्य प्रशांत गायकवाड यांच्यासह प्राध्यापक, कर्मचा-यांनी केले.