दुर्गेश सोनार, बालाजी देवर्जनकर -आई मराठी... कनडा मावशी... तेलुगू मामा... उर्दू चाचा... अशी भाषिक सरमिसळीची समृद्धी लाभलेली उदगिरी बोली सारस्वतांच्या सहवासाने फुलेल. तिला मराठीच्या मायेचा, जिव्हाळ्याचा लळाही लाभेल. इथली मराठी वेगळ्याच धाटणीत कशी याची अनुभूती सारस्वतांना होईल. ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पर्वाला आज आरंभ होतोय. अनेक साहित्यिक पाहुणे आलेत, काही रस्त्यात आहेत. सगळेच सकाळी, दुपारपर्यंत पोहोचतील. उदगीरकरांना भारीच म्हणावं लागेल.. अवघ्या तीन महिन्यांत संमेलनाची तयारी सोपी नाही. त्यातही कोविड जाणार.. नाही जाणार.. असेच सुरू होते. वरून निर्बंधांचे टेन्शन होते. नाशिकच्या संमेलनात कोविड निर्बंधमुक्त झाला... इथून उदगीरच्या आयोजकांचाही उत्साह द्विगुणित झाला. आता मागे हटायचे नाही, असा चंग बांधला आणि आयोजकांनी उदगिरी जिद्द पूर्ण करून दाखवली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्घाटक असणार हे निश्चित होते आणि ‘रोड’करी असं ज्यांना आदरानं संबोधलं जातं, त्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना समारोपाला आणायचंच म्हणून आयोजक मंडळी गडकरींच्या घरी व दिल्ली कार्यालयात धडकली. गडकरी यांच्याकडे कधीही जा, दुरून आलेल्या पाहुण्यांचे ते मन मोडत नाहीत. स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, बसवराज पाटील, कार्यवाह रामचंद्र तिरुके यांना त्यांनी शब्द दिला. ‘मी येईन उदगीरला.’ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही समारोपासाठी येण्याचा आग्रह धरला खरा; पण राष्ट्रपतींचं येणं अनिश्चित आहे. खरंतर, संमेलन म्हटलं की सर्वांची सोय करण्यासाठी आयोजकांना झटावे लागते. सगळेच दिवसरात्र झटले. आपल्याला नावं ठेवू नयेत म्हणून सर्वांनीच दिवसरात्र एक केला. उणिवा असतात. राहून जातात. इतकं मोठं आयोजन आणि आयोजकत्व उदगीरकर मंडळींनी कधी स्वीकारलेलं नाही. उदगीरकर मंडळीत एक मायेचा गोडवा आहे. ते तुमचं स्वागत आदरानं करतील. चुकलं-बिकलं तर माफ करा, म्हणतील.
संमेलनाचा उत्साह वाढावा, म्हणून ‘अजय-अतुल यांची संगीत रजनी’ व ‘चला हवा येऊ द्या’ची पर्वणी हे प्रयोजन. दोन्ही कार्यक्रम हाऊसफुल्ल ठरले. पण, जरा पाहुणे मंडळींच्या व्यवस्थेची उणीव आणि थोडीशी अव्यवस्था संमेलनस्थळी दिसली. नेमकं पाहुण्यांनी आल्यावर कुणाला भेटावं हे आल्यानंतर समजत नाही. तसे स्वतंत्र कक्ष हवे होते. ही उणीव दोन दिवस गोंधळ वाढवू शकते. ज्यांना आवतन म्हणजेच निमंत्रण पोहोचले, ज्यांना मेसेज पोहोचले ते पाहुणे येत होते.. माझी व्यवस्था कुठे... तिथे कसे जाता येईल, असा प्रश्न करत होते. पण, स्वतंत्र कक्ष व जबाबदार व्यक्ती तिथं भेटत नसल्याने जरा गोंधळ उडालेला होता.
उद्या पहिल्या दिवशी वाहनांनी, रेल्वेने मंडळी येतील. आयोजकांनी उदगीरमधील राहण्याची सर्व ठिकाणे बुक केली आहेत. त्यामुळे एक प्रेक्षक म्हणून येणाऱ्याने नेमके कुठे राहावे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. माध्यमांच्या सोयीसाठी कनेक्टिव्हिटी असलेला स्वतंत्र कक्ष, स्वतंत्र संगणक व्यवस्था असे नियोजन असायला हवे होते. ज्या प्रसिद्धी प्रमुखांवर ही जबाबदारी विश्वासाने दिली, तेही दुपारपर्यंत मोबाईल बंद करून होते. संमेलनाला आलेल्या स्टॉलधारकांना अलॉटमेंट झाले. पण, राहायचे कुठे, असा प्रश्न काहींनी केल्यानंतर, ते तुमचे तुम्हाला पाहायचेय, असे सांगितले गेले. एकंदरीतच आयोजकांचा मूळ हेतू प्रामाणिक आहे हे मान्य असले तरी आज पहिल्या दिवसापासून तरी सारस्वत, पाहुण्यांना असं म्हणू नये अशी व्यवस्था लावावी.
- एकंदरीतच आयोजकांचा मूळ हेतू प्रामाणिक आहे हे मान्य असले तरी आज पहिल्या दिवसापासून तरी सारस्वत, पाहुण्यांना असं म्हणू नये अशी व्यवस्था लावावी.
- उदगीरने भव्य आयोजनाची धुरा अंगावर घेतली. घेतला वसा टाकणार नाही, असा उदगीरकर मंडळींचा स्वभावगुण आहे. ‘पावन्यासाठी कायबी करू’ अशी उदगिरी आग्रहाची मायेची फुंकर ते घालतील. लई दिवसानं... लई नवसानं हे संमेलन होतंय. ते निश्चितच यशस्वी, अविस्मरणीय करून दाखवतील, हे निश्चित.