लातूर : गेल्या तीन दिवसांपासून लातूर शहर व जिल्ह्यात सर्वत्र श्रावणसरी कोसळत आहेत. या सरी हलक्या स्वरूपाच्या असल्या तरी जिल्ह्यात सर्वदूर कोसळत असल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १३ मि.मी. पाऊस झाला आहे. तर लातूर शहराला पिण्यासाठी प्रमुख स्रोत असलेल्या मांजरा प्रकल्प क्षेत्रात २४ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे मांजरा प्रकल्पाची पाणीपातळी तीन सेंटिमीटरने वाढली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मांजरा प्रकल्पात ०.६६२ द.ल.घ.मी. नवीन पाणीसाठा झाला. यामुळे मांजरा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या २१ पाणीपुरवठा योजनांच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ४०६ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून श्रावणसरी कोसळत असल्यामुळे कोमात गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. उताऱ्यात घट होणार असली तरी सद्य:स्थितीत सोयाबीनसह अन्य पिके उभी टाकली आहेत. पाऊस मोठा नसला तरी हलक्या सरी कोसळत असल्याने थांबलेली पिकांची वाढ पुन्हा उभारी घेत आहे. तिकडे मांजरा प्रकल्पक्षेत्रात तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसागणिक वाढत आहे. सध्या मांजरा प्रकल्पात २४.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे; तर गेल्या २४ तासांमध्ये ०.६६२ द.ल.घ.मी. नवीन पाणी आले आहे. हे नवीन पाणी किमान महिनाभर पुरू शकते. यामुळे लातूरसह अन्य गावांना दिलासा मिळाला आहे.
मांजरा प्रकल्पात ४३.१०१ जिवंत पाणीसाठामांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये यंदाच्या पावसाळ्यात १६.०८९ द.ल.घ.मी. नवीन पाणी आले आहे; तर गेल्या २४ तासांमध्ये ०.६६२ नवीन पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्प क्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २४ मि.मी. पाऊस झाला असून, सद्य:स्थितीत मांजरा प्रकल्पामध्ये २४.३६ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. म्हणजे ४३.१०१ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा झाला असल्याची माहिती मांजरा प्रकल्प शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.
थेंबे थेंबे तळे साचे; श्रावणसरींमुळे मिळाला दिलासाकाही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून श्रावणसरी कोसळत आहेत. धरणांमध्येही थेंबे-थेंबे पाणी साचत आहे. पोळ्यापर्यंत असाच पाऊस राहिला तर पाणीपातळीत मोठी वाढ होऊ शकते. गतवर्षीही मांजरा प्रकल्पात एकदम पाणीसाठा झाला नव्हता. शेवटच्या टप्प्यातच पाऊस झाल्यानंतर धरण भरले होते. यंदाही शेवटी धरण भरेल, अशी अपेक्षा आहे. सध्या श्रावणसरी कोसळत असल्याने धरणात थोडे-थोडे पाणी येत आहे.