लातूर : शासकीय, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक-दोन महिन्यांचे वेतन रखडले किंवा उशीर झाला तर सर्वांचेच नियोजन कोलमडते. त्यावर चर्चाही होतात, वरिष्ठ स्तरावर तोडगाही निघतो. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर असलेल्या रुग्णवाहिका चालकांचे जवळपास १६ महिन्यांचे वेतन खासगी कंपनीकडे रखडले आहे. परिणामी, कुटुंबाची उपासमार सुरू आहे.
जेमतेम वेतनावर कार्यरत असलेल्या चालकांचा नियुक्त केलेल्या कंपनीचा कोणी फोनही उचलत नाही. पैशासाठी कोणी आश्वस्तही करीत नाही. अधिकाऱ्यांकडे गेले की बोलू, करू, सांगू यापुढे कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अडचणींचा डोंगर वाढत चालला आहे, १६ महिन्यांचे वेतन रखडल्याने घरात वाद वाढले आहेत. घरात पगार झाला नसल्याचे सांगितले की विश्वासही बसत नाही. त्यामुळे नोकरी करावी की सोडावी अशा द्विधा मन:स्थितीत चालक सापडले आहेत. गावस्तरावरून रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात पोहोचविण्याचे काम करणाऱ्या रुग्णवाहिका चालविण्यासाठी सी.एस.सी.ई.-गव्हर्नन्स इंडिया लिमिटेड या एजन्सीमार्फत कंत्राटी स्वरूपात वाहनचालक नियुक्त करण्यात आले आहेत. ज्यांनी नियुक्ती दिली त्या कंपनीचा कोणी जबाबदार अधिकारी, कर्मचारी नेमकं चाललंय काय, याची विचारपूसही करीत नाही. एवढा बिनधास्तपणा कंपनीला आला कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कंपनीचे लोक फोनही उचलत नाहीत...
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवर चालक नियुक्त करण्यासाठी सी.एस.सी.ई. - गव्हर्नन्स इंडिया लिमिटेड या एजन्सीला शासनाने नियुक्त केले आहे. कंपनीने लातूर जिल्ह्यात दोन टप्प्यात चालकांची नियुक्ती केली. नियुक्तीनंतर केवळ दोन महिन्यांचे वेतन देण्यात आले. उर्वरित १६ महिन्यांचे वेतन रखडले. कंपनीला फोन केला की कोणी फोनही उचलत नाही. जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना विचारणा केली, तर बघू, सांगू असे आश्वासन दिले जाते. काहीवेळा तर तुम्हाला ज्यांनी नियुक्त केले त्यांच्याकडे जा... असेही उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याचे चालक सांगत आहेत.
काम सांगता तसं वेतनासाठीही बोला की...
प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर रुग्णवाहिका चालकांकडून वैद्यकीय अधिकारी काम करून घेतात. तसेच तालुका, जिल्हास्तरावरही वरिष्ठ अधिकारी कामाचा आढावा घेतात. १६ महिने काम करून हातात रुपयाही आला नाही. खायचं काय, मुलांचे शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक गरजा भागवायच्या कशा. साहेब... काम करून घेणाऱ्यांनी तरी कंपनीला बोलावे, आता आमचा संसार मोडायची वेळ आली आहे, असे चालक सांगत आहेत.