लातूर : आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने दिल्लीत अमृत रोपवाटिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक पंचायत समितीतून मातीचा एक कलश पाठविण्यात येणार आहे. पंचायत समितीचा हा कलश प्रत्येक गावच्या मातीपासून बनविण्यात येणार आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी देशातील ७ हजार ५०० पंचायत समितींचे मातीचे कलश दिल्लीत पोहोचणार आहेत.
आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या वतीने वर्षभर देशात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७५ वर्षांतील घडामोडींना उजाळा देण्यासाठी, ग्रामविकासातील विविध कल्याणकारी योजनांमध्ये गतिमानता आणून सर्व समाज घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याबरोबरच जनजागृती आणि चांगल्या सेवांद्वारे लोकचळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अमृतमहोत्सवाची सांगता दि. ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. मेरी माटी- मेरा देश, मिट्टी को नमन-विरो का वंदन अशी सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारची थीम आहे.
या कालावधीत प्रत्येक गावांत स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानार्थ स्मारक शिल्पाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यावर पंतप्रधानांचा संदेश, वीरांची नावे व अभिवादन कोरणे अपेक्षित आहे. तसेच विकसित भारताचे लक्ष, गुलामीपासून मुक्ती, आपल्या वारसा स्थळांचा अभिमान, एकता व एकजुटता, नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना या पंचप्राणाची शपथ देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीत ७५ झाडांची विशेष लागवड, सैन्य दलातील जवान, शहीद-वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा तसेच स्वातंत्र्यसेनानींचा आणि त्यांच्या कुटुंबाचा गौरव करण्याच्या सूचना केंद्र शासनाने जिल्हा परिषदेस केल्या आहेत.
जिल्हास्तरावरही रोपवाटिका...आझादी का अमृतमहोत्सवानिमित्ताने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील मातीचा कलश तयार करण्यात येणार आहे. ते पंचायत समितीत एकत्र करून जिल्ह्यास आणि दिल्लीसाठी प्रत्येकी एक कलश तयार करून पाठविण्यात येणार आहे. त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद