लातूर शहर वाहतूक शाखा आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यांच्यावतीने आपल्या हद्दीत वर्षभर वाहन तपासणीची माेहीम हाती घेतली जाते. काेराेना काळात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. शिवाय, वाहतुकीचे नियम माेडणाऱ्या वाहनांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. तर काही जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ अखेर लातूर पाेलिसांनी केलेल्या कारवाईत माेठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तब्बल ८५ हजारांपेक्षा अधिक वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे चांगलेच अंगलट आले आहे.
माेटारसायकल चालकांनाे हे नियम पाळा...
वाहनधारकांनी नियमांचे पालक करण्याची आता गरज आहे. नियम माेडणे अंगलट येणार आहे. चालकाने आपल्या वाहनासाेबत हेल्मेट, वाहनाचे कागदपत्र, लायसन्स आदी महत्त्वाचे कागदपत्र ठेवणे गरजेचे आहे.
वाहन चालविताना नियमांचे पालन करावे. इ-चालान फाडले तर ताे दंड भरावा, अन्यथा थकबाकी दिसून येते. लातूर शहरात माेटारसायकलवरून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पीयूसी प्रमाणपत्र, इन्श्यूरन्सची कागदपत्रे यासह इतर महत्त्वाची कागदपत्रे साेबत ठेवण्याची गरज आहे. आता एका क्लिकवर आपल्या वाहनाची माहिती पाेलिसांना पाहता येते. आपल्या वाहनावर कधी, किती रुपयांचा दंड ठाेठावला आहे. ताे आपण भरला किंवा नाही. हेही समाेर क्षणात येते.