लातूर : अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या राज्यव्यापी संपामुळे २५ दिवसांपासून अंगणवाड्या बंद आहेत. परिणामी, बालकांचे शालेय पूर्व शिक्षण अन् पोषण आहार थांबला आहे. तो पूर्ववत सुरु करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी मुख्याध्यापकांच्या संमतीने पहिलीच्या वर्गात अंगणवाडीतील बालकांना बसवून शिक्षण आणि पोषण आहार देण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात हालचाली सुरु झाल्या असून तात्पुरत्या स्वरुपात अंगणवाडीतील बालके आता शाळेत शिकणार आहेत.
अंगणवाडीच्या माध्यमातून ३ ते ६ वयोगटातील बालकांना शालेय पूर्व शिक्षण दिले जाते. त्याचबरोबर कुपोषण निर्मूलनासाठी सहा महिने ते सहा वयोगटातील बालकांना पोषक आहार दिला जातो. तसेच गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांच्या पाेटी जन्मणारे बाळ हे सदृढ असावे म्हणून पोषक आहार दिला जातो. दरम्यान, विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनी ४ डिसेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. २५ दिवस उलटले तरी अद्यापही तोडगा न निघाल्याने संप मिटलेला नाही. आंदोलनामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांना टाळे लागले आहे.
जिल्ह्यात एकूण अंगणवाड्या - २३२४अंगणवाडी सेविका - २१७२मदतनीस - २१७२मिनी अंगणवाडी सेविका - १५२
६३ हजार बालके पूर्व शिक्षणापासून दुरावली...तालुका - ३ ते ६ वयोगटातील बालकेअहमदपूर - ६५६२औसा - ९४६४चाकूर - ५८५९देवणी - ३०९७जळकोट - २३५८लातूर - १३००२निलंगा - ९८०८रेणापूर - ४२४२शिरुर अनं. - २०८५उदगीर - ६५७२एकूण - ६३०४९
शाळेतच पोषण आहार शिजवून घ्यावा...पोषण आहारासाठीच्या पर्यायी व्यवस्थेत अंगणवाडी पर्यवेक्षिकांवर अधिक जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी सुक्ष्म नियोजन आराखडा तयार करुन अंगणवाडीतील संपूर्ण साहित्य पंचनामा करुन मोजून घ्यावे. अंगणवाडी सेविकांनी टाळाटाळ केल्यास कायदेशीर कारवाई करावी. प्राथमिक शाळेच्या आवारातील अंगणवाडी केंद्रातील बालकांना शाळेतील मुलांना आहार शिजवून देणाऱ्या स्वयंपाकीकडून आहार शिजवून घेण्यात यावा. त्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी केंद्रातून कच्चा आहार उपलब्ध करुन द्यावा, असे एकात्मिक बाल विकास योजनेच्या आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रांसाठी स्वयंसेविकांचा शोध सुरु...अंगणवाडी केंद्रे नियमितपणे सुरु राहण्यासाठी व बालकांना शालेय पूर्व शिक्षण देण्यासाठी आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या इतर सेवा- सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर स्थानिक बारावी उत्तीर्ण महिला स्वयंसेविकांची नियुक्ती करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात केंद्रासाठी स्वयंसेविकांचा शोध घेणे सुरु करण्यात आले आहे.
शिक्षण, पोषण आहार देण्यासाठी प्रयत्न सुरु...जिल्हा परिषदेअंतर्गतच्या २३२४ अंगणवाड्यात जवळपास २५ दिवसांपासून बंद आहेत. परिणामी, शालेय पूर्व शिक्षण, पोषण आहार थांबला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकाधिक अंगणवाडी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सरपंच, मुख्याध्यापक, गावातील प्रतिष्ठितांची मदत घेतली जात आहे. लवकरच केंद्र सुरु होतील.- जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.