लातूर : अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. तसेच मानधन वाढीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघांच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मोर्चास शहरातील टाऊन हॉल येथून प्रारंभ झाला. हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. हा मोर्चा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. राज्यात जवळपास दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत. अंगणवाडी सेविकांना मासिक ८ हजार ३०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांना मासिक ५ हजार ८०० रुपये तर मदतनिसांना मासिक ४ हजार २०० रुपये मानधन मिळते.
राज्य शासन त्यांना मानसेवी समजते. त्यामुळे कामगार कल्याण कायद्याचे कोणतेही संरक्षण, लाभ तसेच वाढता महागाई भत्ता मिळत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनिसांतून नाराजी व्यक्त होत आहे. राज्य शासनाने अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. मानधन वाढीच्या आश्वासनाची पूर्तता करावी. ग्रॅच्युईटी देण्यात यावी, सेवानिवृत्त अथवा मृत कर्मचाऱ्यांचे थकित सेवासमाप्ती लाभ देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास २० फेब्रुवारी रोजी राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात कोमल पाटील, सुरेखा बेंबडे, सुनीता भोसले, सुनीता देवशेटवार, मीरा धर्माधिकारी, मंगल जोशी यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.