लातूर : बालकांना शिक्षणाची गोडी लागावी, आनंदी वातावरणात पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविता यावेत, यासाठी गावस्तरावर चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये सध्या सेविकांचा संप सुरू आहे. परिणामी, जिल्ह्यातील ६३ हजार बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाला मागील पंधरा दिवसांपासूृन ब्रेक लागला आहे. आंदोलनाची दखल शासनस्तरावरून घेतली जात नसल्याने बालकांना अजून किती दिवस घरात बसावे लागणार, असा प्रश्न आहे.
लातूर जिल्ह्यात २ हजार ३२४ अंगणवाडी केंद्र आहेत. त्यात काही मिनी अंगणवाड्यांचाही समावेश आहे. या ठिकाणी जवळपास ६३ हजार बालके पूर्वप्राथमिक शिक्षण घेतात. कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे शिक्षणाची गोडी लागत असलेल्या बालकांना सध्या घरातच बसून राहावे लागत आहे. जवळपास १५ दिवसांपासून हा संप सुरू असून, शासन कधी दखल घेणार, असा प्रश्न पालकांतून उपस्थित होत आहे. संपामुळे आमच्या मुलांचे नुकसान का ? असा सवालही आता पालक विचारत आहेत.
मानधन वाढीसाठी आंदोलनाचे अस्त्र...अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान २६ हजार रुपये वेतन द्यावे, आहाराचा दर वाढवून द्यावा, सामाजिक सुरक्षा योजना लागू करून ग्रॅच्युईटी, पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, आदी सुविधा देण्यात याव्यात, यासह इतर मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून लातूर जिल्ह्यातील १९३७ अंगणवाडी सेविका व २११२ मदतनीस संपावर आहेत.
संपामुळे पोषण आहार बंद...लातूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस असे एकूण ४ हजार ४९ जण संपावर आहेत. त्यामुळे अंगणवाडीत बालकांना देण्यात येणारा पोषण आहारही बंद आहे. शिवाय, स्तनदा मातांचा पोषण आहार, ६३ हजार बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण यासह इतर कामे ठप्प झाली आहेत.
शासनाने मागण्यांची पूर्तता करावी...गेल्या अनेक दिवसांपासून शासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. या मानधनात वाढ करणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांनी केली आहे.
केवळ शिक्षण थांबले...अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपामुळे जिल्ह्यातील २३२४ अंगणवाड्या जवळपास १५ दिवसांपासून बंद आहेत. गरोदर मातांना संपापूृर्वीच पोषण आहार वाटप केला आहे. बालके अंगणवाडीत आले तरच त्यांना पोषण आहार दिला जातो. मात्र, संपामुळे ते बंद आहे. मुलांच्या शिक्षणावर काहीअंशी परिणाम होईल. - जावेद शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. लातूर
अंगणवाड्यांची संख्या : २३२४अंगणवाडी सेविका : १९३७अंगणवाडी मदतनीस : २२१२एकूण मुले : ६३,०००मुलांचा वयोगट : ३ ते ६ वर्षेसंपाचे दिवस : १५