लातूर : शहरातील प्रभाग क्र. १२ मधील जुनी रेल्वे लाईन परिसरात असलेले दारु दुकान बंद करावे, या प्रमुख मागणीसाठी महिलांसह नागरिकांनी रस्त्यावरच आज ठिय्या आंदोलन केले. शिवाय, एमआयडीसी पोलीस ठाण्यातही आक्रमक महिलांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देत ठिय्या मांडला. या परिसरातील नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.
शहरातील प्रभाग क्र. १२ जुने रेल्वेलाईन रस्ता, पंचवटीनगर परिसारात देशी दारुची किरकोळ विक्रीचे दुकाने स्थलांतरीत झाले असून, या दोन्ही दारु दुकानांमुळे प्रकाशनगर, गिरवलकर नगर, वाल्मिकीनगर, सोनानगर, आम्लेश्वर नगर, विकास नगर, सय्यदनगर, कुलस्वामिनी नगर आदीं परिसरातील महिला, नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. परिणामी, मद्यपींचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले होते. प्रशासनाकडून या निवेदनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी, नगरसेविका दीपाताई गिते, अॅड. गणेश गोमसाळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिला, नागरिकांनी दुकानात घुसून दारुंच्या बाटल्या रस्त्यावर आणून फोडत प्रशासनाचा निषेध नोंदविला. या दारुदुकानाविरोधात महिलांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले.
शिवाय, जिल्हा प्रशासनाच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन करुन बांगड्याचे आहेर दिले. आंदालनानंतर महिला, नागरिकांचा मोर्चा हालगी वाजवित एमआयडीसी पोलीस ठाण्यावर धडकला. पोलीस ठाण्याच्या परिसरात महिलांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलीस प्रशासनाकडून आंदोलनक महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र, प्रशासनाकडून आपल्या मागण्यांची जाणिवपूर्वक दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. याला पोलीस प्रशासनाचेही पाठबळ मिळत आहे. या भागात अवैध व्यवसायाकडे एमआयडीसी पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे, नागरिकांनी सांगतिले.
जिल्हाधिकारी कार्यालयावरही धडकला मोर्चा...शहरातील प्रभाग क्र. १२ मध्ये असलेले दारु दुकान बंद करावे, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात राहणाऱ्या महिला, नागरिकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा, निवेदने दिली आहेत. मात्र, प्रशासनाकडून आपल्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. याविरोधात संतप्त महिलांनी चक्क दारु दुकानांवर चाल करुन, दुकानातील दारुंचे बॉक्स रस्त्यावर आणून फोडले. यावेळी एमआयडीसी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनक महिलांचे समाधान झाले नाही. एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून हा मोर्चा हालगीच्य निनादात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक शशिकला गोमचाळे, दीपाताई गिते, देवाभाऊ साळुंके, अॅड़ गणेश गोमचाळे, अॅड़ अन्सार शेख, सुशील जळकोटे आदींची उपस्थिती होती़