औसा (लातूर) : थकित वीजबिलापोटी विद्युत कनेक्शन तोडण्यात आल्याने १० दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद पडली आहे. परिणामी, शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवारी काँग्रेसने पालिकेत पालथ्या घागरी ठेऊन प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
५० हजार लोकसंख्येच्या औसा शहरात सध्या कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा योजना चांगल्या असतानाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वीजबिल थकित राहिले आहे. परिणामी, दीड महिन्यात महावितरणने तिसऱ्यांदा पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन तोडले आहे. शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीनेग्रेसच्या वतीने पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले. तसेच पालथ्या घागरी ठेवून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शकिल शेख, खुंदमिर मुल्ला, अंंगद कांबळे, अनिस जहागीरदार, पुरुषोत्तम नलगे, पाशा शेख, ॲड. समियोद्दीन पटेल, इस्माईल शेख, मुज्जमिल शेख, जयराज कसबे, नियामत लोहारे, उस्मान सिद्दिकी, मोहसीन शेख, अजहर पटेल आदींची उपस्थिती होती.
एमआयएमही आक्रमक...उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरात पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घंटागाड्याही बंद आहेत. त्यामुळे पालिकेला कुलूप ठोकण्याचा इशारा एमआयएमचे मुज्जफरअली सय्यद यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल...पालिकेने थकित वीजबिलापोटी ८ लाख भरले आहेत. जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा महावितरणने बंद केल्यामुळे ७ ते ८ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. वीजबिल भरल्यामुळे महावितरणने खंडित केलेला वीजपुरवठा सोमवारी सुरू केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून शहराला पूर्ववत पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता सोनवणे यांनी दिली.