लातूर : मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी अर्थसहाय करण्यात येते. त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविली जाते. मात्र, या योजनेसाठी बँकांचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे मंजूरीसाठी बँकानी सकारात्मकता ठेवावी. प्रत्येक महिन्याला बँकाकडे प्रलंबित असलेल्या कर्जप्रकरणांचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येथे मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत ते म्हणाले, महामंडळाअंतर्गत बँकानी राज्यात ५८ हजार ३१ लाभार्थ्यांना ४ हजार कोटी ५६ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. महामंडळाने ३८५ कोटी ९३ लाखांचा व्याज परतावा दिलेला आहे. तर सध्या ५२ हजार ५७१ लाभार्थ्यांचा व्याज परतावा सुरु आहे. एक लाख लाभार्थ्यांना कर्ज योजनेचा लाभ देण्याचा मानस आहे. लातूर जिल्ह्यातील बँकांचे महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटपासाठी अपेक्षित सहकार्य नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याला प्रलंबित आणि मंजूर कर्जप्रकरणांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले. पत्रपरिषदेस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यात १६८२ लाभार्थी...लातूर जिल्ह्यात महामंडळांतर्गत बँकानी १ हजार ६८२ लाभार्थ्यांना १२९ कोटी ३६ लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. आतापर्यंत ११ कोटी ९० लाख रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला असून, सद्यस्थितीत व्याज परतावा सुरु असलेले १४५२ लाभार्थी आहेत. वैयक्तिक तसेच शैक्षणिक कर्ज देण्याचाही महामंडळाचा मानस असल्याचेही महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले.