लातूर : ५३ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेना यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात ४५० कॅडेट्सनी गोळीबाराचा सराव केला. तसेच, सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार करण्याची माहिती घेतली. त्याचबरोबर प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
खंडापूर येथील शासकीय मुला- मुलींचे वसतिगृह येथे १६ ते २५ मे या कालावधीत वार्षिक प्रशिक्षण शिबिर होत आहे. उद्घाटन वार्षिक प्रशिक्षण अधिकारी कर्नल हेमंत जोशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कर्नल वाय. बी. सिंह, प्रशासकीय अधिकारी, एनसीसीचे अधिकारी, भारतीय सैन्य दलातील प्रशिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरणच्या सहाय्याने सर्पमित्र राहुल कांबळे यांनी कॅडेट्सना सर्पाचे प्रकार, सर्प दंश झाल्यास प्रथमोचाराची माहिती दिली. प्रशिक्षणादरम्यान ०.२२ रायफलची ४५० कॅडेट्सनी गोळीबाराचा सराव बीएसएफ ट्रेनिंग सेंटर येथे डेप्युटी कॅम्प कमांडट लेफ्टनंट कर्नल बाय. थी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली केला. चार तुकड्यांमध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यातील कॅडेट्स होते. यशस्वितेसाठी कमान अधिकारी कर्नल हेमंत जोशी, प्रशासकीय अधिकारी वाय. बी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुभेदार मेजर शंभू सिंग, शेखर थोरात, शेख पाशा, उत्तम पाटील, हरिंदर सिंग, नायब सुभेदार बाजीराव पाटील, लेफ्टनंट अतिश तिडके, गुणवंत ताटे, सिद्दिकी जे. के., मकरंद पाटील, बी.एच.एम. योगेश बारसे, हवालदार अजमेर सिंग, बी.व्ही. घोगरे, आर. आर. पवार आदी परिश्रम घेत आहेत.
राष्ट्र निर्मितीत मोलाचे योगदान...कमान अधिकारी कर्नल हेमंत जोशी म्हणाले, राष्ट्र निर्मितीसाठी राष्ट्रीय सेनेचे मोलाचे योगदान आहे. कॅडेट्मध्ये सामाजिक जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. तसेच, त्यांनी एकता व शिस्त, वेळेचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. शिबिरातील सवयी त्यांनी निरंतर जीवनामध्ये सुरू ठेवावी, असेही ते म्हणाले.