लातूर : जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून शासकीय-निमशासकीय, शिक्षक-शिक्षकेत्तर समन्वय समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या मांडत धरणे आंदोलन केले. दरम्यान, कर्मचारी संपामुळे सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
जुन्या पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्यावतीने अनेकवेळा आंदोलने, मोर्चे व निवेदने देण्यात आली. मात्र, शासनाने याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जवळपास ६० संघटनांनी एकत्र येत एकच मिशन-जुनी पेन्शनचा नारा देत बेमुदत संपाची हाक दिली आहे. मंगळवारपासून हा संप सुरु असल्याने बुधवारीही कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसत होता. कामासाठी बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोर जावे लागले. दरम्यान, जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ठिय्या मारला आहे.
यावेळी एकच मिशन, जुनी पेन्शन घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यात पुरुष कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. यावेळी संघटनेचे बी.बी. गायकवाड, निमंत्रक संजय कलशेट्टी, आर.एस. तांदळे, महादेव पांचाळ, संतोष माने, अनंत सुर्यवंशी, महेश हिप्परगे, तानाजी सोमवंशी, अरविंद पुलगुर्ले, दिपक येवते, अशोक माळगे, नितीन बनसोडे, दत्तात्रय सुर्यवंशी, सुभाष मस्के, धनंजय उजनकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनात शिक्षकांचाही सहभाग...जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असलेल्या बेमुदत संपामध्ये शिक्षक संघटनांनीही सहभाग घेतला आहे. जिल्हास्तरावर जुने जिल्हाधिकारी कार्यालय तर निलंगा, देवणी, जळकोट, शिरुर अनंतपाळ, चाकूर, अहमदपूर, औसा, रेणापूर, उदगीर या तालुक्यांमध्येही शासकीय कर्मचारी, शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. दरम्यान, जोपर्यंत जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे.