लातूर : शहरातील श्वानांची वाढती संख्या व त्यामुळे वृद्ध नागरिक,लहान मुले आणि महिलांना होणारा त्रास लक्षात घेता मनपाच्या वतीने अँटीरेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.या अंतर्गत आतापर्यंत ७८० भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले असून आपल्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन मनपा व उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
लातूर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.यामुळे वृद्ध नागरिक,लहान मुले व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा ही भटकी कुत्री नागरिकांना चावा घेऊन जखमी करत आहेत. हा त्रास कमी करण्यासाठी भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे.त्यासाठी मनपाकडून मुलुंड येथील ग्लोबल फाउंडेशनच्या सहकार्यातून अँटीरेबीज लसीकरण करण्यात येत आहे.या अंतर्गत लसीकरण करून कुत्र्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी सोडण्यात येते.कुत्र्यांचा वाढता त्रास लक्षात घेता ही प्रक्रिया अधिक परिणामकारक व गतिमान करण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे.
दर शनिवारी अँटीरेबीज लसीकरण....एप्रिल महिन्यापासून दर शनिवारी अँटीरेबीज लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सध्याही प्रभाग निहाय लसीकरण केले जात आहे. ज्या भागात भटक्या कुत्र्यांचा त्रास अधिक आहे. त्या भागातील नागरिकांनी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या ८६५५३२३१६८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. त्यानुसार माहिती घेऊन त्या-त्या परिसरात दर शनिवारी अँटीरेबीज लसीकरण करणे शक्य होईल.