वन शेती उपअभियानासाठी प्रस्ताव सादर करावे
लातूर : केंद्र शासनाने वन शेतीविषयक धोरण लागू केले आहे. शेतावर वृक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. २०२०-२१ या वर्षामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या शेतकऱ्यांनी वन वृक्षाची लागवड केली आहे किंवा इच्छुक आहेत, अशा शेतकऱ्यांनी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे २७ जानेवारीपूर्वी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत रोपानुसार अनुदान दिले जाते.
अंदोरा येथून लोखंडी पाईपची चोरी
लातूर : अंदोरा येथील एका बोअरजवळ असलेले १८ लोखंडी पाईप चोरीला गेल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी फिर्यादी शंकर चनाप्पा बसरंगे (३५, रा. अंदोरा, ता. औसा) यांच्या तक्रारीवरून भादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. चव्हाण करीत आहेत.
शिवीगाळ करीत एकास मारहाण
लातूर : तू ऑटो या पॉईंटला का लावलास म्हणून शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व ऑटोचे काच फोडून एक हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी फिर्यादी सतीश प्रभाकर बोरेवार (३३, रा. पाटील गल्ली, अहमदपूर) यांच्या तक्रारीवरून महंमद कादर शेख व सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीवर अहमदपूर पोलीस ठाण्यात एचएमएनसी दाखल करण्यात आली आहे.
शेतात जाण्याच्या कारणावरून मारहाण
लातूर : गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना शेतातून जाण्याच्या कारणावरून भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करीत काठ्या व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना किनीनवरे शेतशिवारात घडली. या प्रकरणी विश्वनाथ लक्ष्मण गायकवाड यांच्या तक्रारीवरून संतोष माधव गायकवाड व सोबत असलेल्या चौघा जणांविरोधात किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. उस्तुर्गे करीत आहेत.