उदगीर : येथील उदगीर रेल्वे संघर्ष समितीने स्थापनेपासून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, रेल्वे प्रशासनाने नुकत्याच काढलेल्या पत्रकानुसार विकाराबाद-परळी या २६७.७७ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरण मागणीला फायनल लोकेशन सर्वेक्षणसाठी दिल्ली बोर्डाने मान्यता दिली आहे.
विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. हैदराबाद ते मनमाड, हैदराबाद ते नांदेड यासह अनेक ठिकाणे जोडणारा हा सुलभ मार्ग आहे. या दुहेरीकरणाच्या मागणीसाठी कायम आग्रही असणारे बिदरचे केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन राहिले आहे. ही योजना मंजूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मंजुरीबद्दल परिसरातून आभार व्यक्त होत आहेत.
विद्युतीकरणाचा शिल्लक राहिलेला अंतिम टप्पा आणि दुहेरीकरणाला मिळालेली मंजुरी या भागातील सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे या लोहमार्गावरील प्रवास, अधिक गतिमान, पर्यावरणपूरक, इंधन व वेळ बचत करणारा ठरणार आहे.
विकाराबाद ते परळी मार्गावर धावणाऱ्या गाड्या...हैदराबाद- औरंगाबाद, हैदराबाद- पूर्णा, काकीनाडा- शिर्डी, विजयवाडा- शिर्डी, सिकंदराबाद- शिर्डी, तिरुपती- शिर्डी, रेनिगुंटा- औरंगाबाद, नांदेड- बंगळुरू याशिवाय मालगाडी या लोहमार्गावरून धावते. विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. हैदराबाद ते मनमाड, हैदराबाद ते नांदेड यासह अनेक ठिकाणे जोडणारा हा सुलभ मार्ग आहे.
रेल्वे विकासात ही मंजुरी महत्त्वपूर्ण उदगीर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने समितीच्या स्थापनेपासून विकाराबाद ते परळी लोहमार्ग दुहेरीकरणासाठी पाठपुरावा होत आहे. उशिरा का होईना याला मंजुरी मिळाली. यासाठी समितीला मंत्री, खासदार, आमदार यांचे सहकार्य लाभले. उदगीर व परिसरातील रेल्वे विकासात ही मंजुरी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्य, दक्षिण मध्य रेल्वे तथा उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतिलाल डोईजोडे यांनी सांगितले.