लातूर : तिकिट घेतल्यानंतर प्रवाशाने सुट्या पैशांची मागणी केली, याच पैशाच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून चार जणांनी मारहाण केल्याची घटना रेणापूर तालुक्यातील सिंधगाव मार्गावर रविवारी घडली. शिवाय, एका प्रवाशाने वाहकाच्या पिंडरीला (पायाला) चावा घेत जखमी केले. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात चार जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी बालाजी आमरस माेरे (वय ३३, रा. गुत्ती, ता. जळकाेट) हे लातूर आगारात गेल्या दहा वर्षांपासून वाहक म्हणून सेवारत आहेत. दरम्यान, ते लातूर बसस्थानकातून रेणापूर- सिंधगाव- पाेहरेगाव बस घेऊन शनिवार, २४ सप्टेंबर राेजी मार्गस्थ झाले हाेते. दरम्यान, सिंधगाव येथील चाैकामध्ये प्रवासी उतरण्यासाठी बस थाबविण्यात आली. यावेळी लातूर येथून दाेघा प्रवाशांनी ५०० रुपयांच्या नाेटा दिल्या. एकाचे त्यांनी सुट्टे पैसे दिले. दुसऱ्याचे ४५ रुपये तिकिट झाले हाेते. त्यांना वाहकाने ४५० रुपये सुट्टे दिले आणि पाच रुपये एका प्रवाशाला देण्याबाबत सांगितले. यावेळी पाच रुपयासाठी मी त्यांच्या मागे फिरु का, असा सवाल उपस्थित केला. यातून वादावादी, बाचाबाची झाली. दरम्यान, वाहक माेरे यांना नवनाथ चेवले याच्यासह अन्य तिघांनी (सर्व रा. सिंधगाव, ता. रेणापूर) यांनी संगणमत करून फिर्यादी वाहकाला सुट्टे पैशाच्या कारणावरुन, कुरापत काढून शिवीगाळ करत धक्काबुकी करून मारहाण केली.
यावेळी चाैथ्या क्रमांकाच्या व्यक्तीने वाहकाच्या उजव्या पायाला जाेराने चावा घेत जखमी केले. त्याचबराेबर शासकीय कामात अडथळा निर्माण केला. हा वाद सुरू असताना बसमधील प्रवाशांनी साेडविण्यासाठी प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. केवळ पाच रुपयांच्या सुट्या पैशावरून वाहकाला मारहाण करून, चावा घेण्यात आल्याची घटना घडल्याचे पाेलिसांनी सांगितले. याबाबत रेणापूर पाेलीस ठाण्यात बालाजी माेरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवनाथ चेवले याच्यासह अन्य तिघांविराेधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पाेलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कन्हेरे करत आहेत.