लातूर : नीट प्रकरणातील आराेपींची साखळी हैदराबादमार्गे दिल्लीपर्यंत पाेहचली असल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे. आराेपी एकमेकांशी कसे भटले, त्यांच्या कामकाजाची पद्धती कशी हाेती, याबाबत मंगळवारी घेतलेल्या जबाबातून काही खुलासे झाले आहेत.
आराेपी जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण आणि शिक्षक संजय जाधव हे दाेघेही उमरगा येथील आयटीआयमध्ये कार्यरत असलेला इरण्णा काेनगलवार याच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची भेट लातुरात झाली. इरण्णा उमरग्याला नाेकरी असली तरी वास्तव्याला लातुरात हाेता. पठाण, जाधव यांच्याकडून मिळालेली प्रवेशपत्रे इरण्णा दिल्लीला पाठवत हाेता.
दिल्लीचा आराेपी हैदराबादमध्ये हाेता...
दिल्लीतील आराेपी गंगाधर हा हैदराबादमध्ये आला. त्याला भेटण्यासाठी लातूर येथून इरण्णा गेला हाेता, अशी माहिती पाेलिस चाैकशी आराेपी शिक्षक संजय जाधव याने मंगळवारी दिली. पठाण, जाधव हे दाेघेही लातुरात राहूनच काम करत हाेते. तर दिल्लीच्या गंगाधरशी मध्यस्थ म्हणून इरण्णाची जबाबदारी हाेती. आता इरण्णा आणि गंगाधर ताब्यात आल्यानंतरच नीट गुणवाढीचे पुढे काय कनक्शेन आहे. हे स्पष्ट हाेणार आहे.
मुख्याध्यापक पठाण निलंबित...
नीट प्रकरणातील आराेपी मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण (जिल्हा परिषद शाळा, कातपूर ता. लातूर) यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी निलंबित केले आहे. निलंबन आदेशात म्हटले आहे, आराेपी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. त्यांची जबाबदारी शैक्षणिक कामकाज असताना त्यांची सेवेविषयी बेपर्वाई व अनास्था दिसून आली आहे.