ऑनलाइन लोकमत
लातुर, दि. ८ - चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील अनेक मुलांच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली असून, त्यांच्या व्हॉटस् अँपवर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ तसेच मेसेज आहेत. प्राथमिक तपासणीत चौघा जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. चाकूर : व्हॉटस्अँपवर आक्षेपार्ह चलचित्र (व्हीडीओ) टाकून चिथावणी देत भावना भडकविल्याच्या आरोपावरुन एका ग्रुपच्या अँडमिनसह अन्य तिघांविरुध्द चाकूर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करुन चौघांनाही अटक केली आहे.
चाकूर तालुक्यातील नळेगाव भागात बुधवारी दुपारी पोलिस उपनिरीक्षक एम. ए. कोणदे, पोकॉ. अविनाश शिंदे हे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीवरुन गावातील अनेकांच्या मोबाईलवर आक्षेपार्ह चलचित्र असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक कोणदे व पोकॉ. शिंदे यांनी सदरील ग्रुपचा शोध घेतला असता 'तात्याचा बंबुरा' या व्हॉटस्अप ग्रुपवर हे चलचित्र असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी शोध घेतला असता नळेगाव येथील संतोष बरचे यांचा हा ग्रुप असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिसांनी बरचे यास ताब्यात घेतले. आणि मोबाईलचा तपास केला असता 'वडवळचा राडा' या ग्रुपवरुन ६ ऑक्टोबर रोजी बरचे यास हे चलचित्र असल्याचे पहावयास मिळाले. पोलिसांनी ग्रुपमधील राजकुमार तेलंगे, अमोल सोमवंशी (सर्वजण रा. नळेगाव), मनोज लहुराळे (रा. वडवळ नागनाथ) यांचे मोबाईल तपासले असता त्यांच्या व्हॉटस्अपवर आक्षेपार्ह चलचित्र होते.
पोलिसांनी चौघांचेही मोबाईल जप्त केले. याप्रकरणी चाकूर पोलिस ठाण्यात कलम १५३, ३४ भादवि व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २000 कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन चौघांनाही रात्री अटक करण्यात आली आहे.