देवणी (लातुर ) : सन २०१७ च्या बाललैगिंक अत्याचार प्रकरणात आरोपीला मदत करणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षकास आज अटक करण्यात आली. कृष्णदेव पाटील असे अटकेतील निलंबित पोलीस निरीक्षकाचे नाव असून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी ही कारवाई केली.
याबाबत पोलिस सुत्राकडुन मिळालेली माहीती अशी की, २०१७ मध्ये तालुक्यातील तळेगाव, विळेगाव येथे बलात्कार, गर्भपात अशी बाललैगिंक अत्याचाराची घटना घडली होती. या दरम्यान येथील ठाण्यात पोलिस निरिक्षक कृष्णदेव पाटील हे कार्यरत होते. या प्रकरणातील आरोपीस पोलिस निरिक्षक पाटील यांनी मदत केल्याने त्यास सहआरोपी करण्यात आले होते. याबाबत गुरनं ६४/२०१७ अन्वये कलम ३६३,३६६(अ),३४,३७६(२),(एन)(डी),३१३,२०१,१६६(अ)भादवि व कलम ३ (अ),४,५(१),६,२१(१) बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अशा गुन्ह्यांची नोंद पाटीलवर आहे.
या प्रकरणी पाटील हे निलंबित असून न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला. यानंतर लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांनी पाटीलला मिरज (सांगली) येथून अटक केली. आरोपीस आज उदगीर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.