लातूर : शहरातील सारोळा राेडवर दुचाकीवरून आलेल्या दाेघांनी मारहाण करून माेबाइल हिसकावत पळ काढल्याची घटना घडली हाेती. दरम्यान, यातील दाेघा आराेपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, १ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील विवेकानंद चौक ठाण्याच्या हद्दीत सारोळा रोडचा दुचाकीवरून आलेल्या दाेघांनी मारहाण करून मोबाइल हिसकावल्याची घटना घडली होती. याबाबत स्वतंत्र दाेन गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, हवालदार राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, अर्जुन राजपूत, मनोज खोसे, नितीन कटारे, राहुल कांबळे, चालक केंद्रे यांच्या पथकाने गुन्ह्याबाबातचा तपास सुरू केला. रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित करत आरोपींचा शोध घेतला जात हाेता. दुचाकीवरून येत मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्यांची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे दुचाकीवरून येत मोबाइल हिसकावणारे, पळविलेले माेबाइल कमी किमतीत लोकांना विकणाऱ्या आरोपींची ओळख पटली. या आराेपींना नांदेड राेडवरील गरुड चौकात सापळा लावून ताब्यात घेतले.
यावेळी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाइल जप्त करण्यात आला. परमेश्वर निवृत्ती बोयणे (वय १९), समीर आजम पठाण (वय १९, रा. शास्त्रीनगर, लातूर) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सारोळा रोडवर नागरिकाला मारहाण केली व मोबाइल हिसकावत पळ काढल्याचे सांगितले. त्यांच्याकडून रोख २८ हजार, सात मोबाइल, दुचाकी, असा १ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फरार झालेल्या इतर साथीदारांचा शाेध सुरू...लातुरातील साराेळा राेडवर दुचाकीवरून आलेल्या दाेघांनी वाटेत आडवून मारहाण केली व माेबाइल हिसकावत पळ काढला. याशिवाय, इतर गुन्हेही या दाेघांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे समाेर आले आहे. आता फरार झालेल्या इतर साथीदारांचा पोलिस शाेध घेत आहेत. त्यांनाही लवकरच अटक केली जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.