- हरी मोकाशे (लातूर)
दीपावलीचा सण आठवडाभरावर आल्याने सध्या बाजारपेठेत शेतमालाची आवक वाढली आहे. आरोग्यासाठी उपयुक्त आणि पौष्टिक असलेल्या पिवळ्या ज्वारीची लातूर उच्चतम बाजार समितीमध्ये आवक वाढत आहे. त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत दरात साधारणत: ४०० रुपयांनी घसरण झाली असून, सध्या बाजारपेठेत कमाल दर ३५२९, तर साधारण दर ३००० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मुगाबरोबर अल्प प्रमाणात पिवळ्या ज्वारीची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबरमध्ये पिवळ्या ज्वारीची सर्वाधिक आवक होत असते. सध्या सोयाबीनची आवक स्थिर असून, ती दैनंदिन २४ हजार क्विंटलपर्यंत होत आहे. दीपावलीसाठी शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत असून, शेतकऱ्यांची बाजारपेठेत लूट होऊ नये, म्हणून सोयाबीनसाठी शेतीमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात आणखीन चांगला भाव मिळेल, या आशेने काही शेतकरी आपले सोयाबीन तारण ठेवून कर्ज घेत आहेत.
मात्र, यंदा उत्पादनच कमी निघत असल्याने बहुतांश शेतकरी मिळेल, त्या दराने विक्री करीत आहेत. गत आठवड्याच्या तुलनेत सर्वसाधारण दरात १५० रुपयांची वाढ हा दर ३२५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उडदाची आवक वाढली असून, ती दीड हजार क्टिंटलपेक्षा जास्त झाली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत कमाल दराबरोबर साधारण दरातही २६० रुपयांची वाढ झाली असून, ४ हजार ९६० रुपये असा दर आहे. सणाच्या तोंडावर मुगाचीही आवक वाढली असून, सध्या ४९०० रुपये भाव मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कमाल दरात जवळपास ५०० रुपयांची घसरण झाली आहे. बाजार समितीमध्ये गव्हास २१००, हायब्रीड ज्वारी १२५०, रबी ज्वारी २४००, मका १३५०, हरभरा ३८५०, तूर ३४९०, तर गुळाला २९५० प्रति क्विंटल भाव मिळत आहे.