लातूर : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जीवाची काहिली होत आहे. या उन्हाचा परिणाम पशुधनाच्या कृत्रिम रेतनावर ही झाला आहे. एप्रिलमध्ये केवळ २ हजार ५०६ पशुधनावर कृत्रिम रेतन झाले आहे. दरम्यान, जनावरांमध्ये गर्भपाताचा धोकाही अधिक वाढला आहे. त्यामुळे पशुधनाची काळजी घेणे अधिक गरजेचे ठरत आहे.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालनाकडे वळावे म्हणून शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात पशुधन संख्या वाढत आहे. त्यामुळे पशुपालकांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात मोठे पशुधन जवळपास ५ लाख आहे. त्यात गायवर्गीय २ लाख ५५ हजार तर म्हैस वर्गीय २ लाख ५७ हजार अशी संख्या आहे. पशुधनात रोगराई निर्माण होऊ नये तसेच आनुवंशिक सुधारणा व्हावी म्हणून पशुसंर्वधन विभागाच्या वतीने पशुधनावर कृत्रिम रेतन करण्यात येते. त्यामुळे जनावरांवर भविष्यात होणारे धोकेही टाळण्यास मदत होते.
हिवाळा ऋतू पशुधनास पाेषक...पशुधनाचा गर्भधारणेचा कालावधी १० महिने १० दिवस असतो. पशुधनात गर्भधारणा राहण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी सर्वात चांगला असतो. कारण पशुधनास मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होतो. त्यामुळे जन्मलेल्या वासरास अथवा कालवडीस पुरेशाच्या प्रमाणात आईचे दूध मिळते.
उन्हाळ्यात कृत्रिम रेतन कमी...पशुधनाच्या गर्भधारणेसाठी थंडीचा कालावधी अधिक चांगला असतो. या कालावधीत हिरवा चारा, पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. उन्हाळ्यात पशुधनाच्या आरोग्यावर काहीसा परिणाम होतो. परिणामी, कृत्रिम रेतनाचे प्रमाणही घटते. शिवाय, जनावरांमध्ये गर्भपाताचा धोकाही असतो. सर्वाधिक कृत्रिम रेतन नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत होते.- डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.
जनावरांचा उन्हापासून करा बचाव...यंदाचा उन्हाळा अधिकच तीव्र आहे. त्यामुळे पशुपालकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. पशुधनास उन्हात उघड्यावर बांधू नये. पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जाऊ नये. शेतीसाठी आणि इतर कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नये, याची दक्षता घ्यावी. पशुधन दाटीवाटीने बांधू नये. भर उन्हात पशुधनाची वाहतूक करु नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
जिल्ह्यात वर्षभरातील कृत्रिम रेतन...मे -२०२२ - ३२५२जून- ४९७९जुलै ४६६३ऑगस्ट ५०८९सप्टेंबर ४८३८ऑक्टोबर ६०८९नोव्हेंबर ७६०४डिसेंबर ७९५७
जानेवारी २०२३- ७०४२फेब्रुवारी ६७५०मार्च ८०९१एप्रिल २५०६