लातूर : राज्यात बंदी असतानाही सर्रासपणे खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. तीही चढ्या दराने. अगदी शासकीय कार्यालयाच्या आवारात तसेच परिसरात असलेल्या पानटपऱ्यांवर त्याची विक्री हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाने लातूर शहर, जिल्ह्यात कारवाई मोहीम हाती घेतली आहे. कारवाईच्या धास्तीने मागील आठ दिवसांपासून शेकडो पानटपऱ्या बंद झाल्या आहेत.
लातूर शहरात जवळपास एक हजाराहून अधिक पानटपऱ्या आहेत. या ठिकाणी पान, सुपारीसोबतच गुटखा, खर्रा, बाबा, रत्ना आदी सुपारीची विक्री केली जाते. इथल्या सुपारीची उलाढाल दररोज क्विंटलमध्ये नसून टनांवर आहे. भाजकी, कच्ची, कत्रण, खडा आदी प्रकारांत ती घासून दिली जाते. याशिवाय, गुटखा, पान मसाला, सिगारेटची विक्री करण्यात येते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून पोलिस, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी गुटखा विक्रेत्यांवर कारवाईची माेहीमच हाती घेतली आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी बहुतांश पानटपऱ्या बंद झाल्या आहेत. लातूर शहरातील पाच नंबर चौक, रेणापूर नाका, संविधान चौक, छत्रपती शाहू महाराज चौक, सुभाष चौक, गंजगोलाई, औसा रोडवरील नंदी स्टॉप, लेबर कॉलनीतील आजम चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागांत नेहमी ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेल्या अनेक पानटपऱ्या बंद झाल्याने गर्दीही कमी झाली आहे.
गुटखा बनतो कुठे, लातूरला येतो कोठून..?लातूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागासह लातूर, मुरूड, नळेगाव, चाकूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, देवणी आदी शहरांमध्ये गुटखा विक्रेत्यांचे खूप मोठे जाळे असल्याचे सांगितले जाते. किरकोळ विक्रेत्यांना होलसेल दरात गुटखा पुरवठा करणारे मोठे व्यावसायिक आहेत. अनेकांची वाहने बिनबोभाट फिरून गुटखा विक्रीचा व्यवसाय करतात. याकडे दुर्लक्ष करीत दिवसभरात हजार, दोन हजारांचा व्यवसाय करणारे विक्रेतेच सध्या पोलिसांच्या रडारवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. गुटखा बनतो कुठे, लातूरला येतो कोठून, शहरात कुठे कुणाचे गोदाम आहे, याची माहिती ठेवणारे ठोक विक्रेते सोडून किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून कामगिरी दाखवत आहेत.
गोदामे, उत्पादकांवर कारवाई केली तर...लातूर जिल्ह्यात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून शहरातील काही पानटपऱ्या, तसेच फिरता व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचा मालही जप्त करण्यात येत आहे. गल्लीबोळातील पानटपऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यापेक्षा ठोक विक्रेत्यांची गोदामे, उत्पादकांवरच कठोर कारवाई केली तर किरकोळ विक्रेत्यांकडे माल येणार कोठून? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
बंदी उठविली तर महसूलही मिळेल...नागरिकांच्या आरोग्यासाठी अपायकारक असलेला गुटखा विक्रीवर राज्यात बंदी घालण्यात आली. त्यानंतर मात्र, अवैधरीत्या गुटखानिर्मिती अन् विक्रेत्यांची साखळी तयार झाली. एक दोन रुपया किमतीचा गुटखा पाचपट किमतीने विकू लागला. तोही खुलेआमपणे. शासनाने बंदी उठवून साखळी तोडली तर महसूलही मिळेल. उगाच रोज रोज कारवाईच्या भीतीची धास्तीही उरणार नाही, असे काही विक्रेते सांगत आहेत.