लातूर : जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढत असून, शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार शिक्षण विभागाने ११ मार्च, सोमवारपासून सकाळी ८ ते १ या वेळेत सर्व व्यवस्थापनाच्या शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र शिक्षण विभागाने काढले असून, सर्व मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत.
मार्च महिन्याचा मध्यावधी सुरू झाला असून, जिल्हाभरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. सोबतच पाणीटंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत शिक्षक संघटनांनी निवेदनही दिले होते. त्यानुसार जि. प.च्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार, ११ मार्चपासून अंमलबजावणी करावी, त्याचा अहवाल सादर करावा अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते दुपारी १ आणि शनिवारी सकाळी ७:३० ते दुपारी ११ या वेळेत शाळा भरणार आहे. याबाबत तासिकांचे वेळापत्रकही शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पाठविले असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी यांनी सांगितले.