लातूर : यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढल्याने जीवाची काहिली होत आहे. तसेच जलस्त्रोतही आटत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील १०२ गावांत तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे उन्हाचे चटके सहन करीत नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाने अधिग्रहणाद्वारे ९० गावांना पाणीपुरवठा सुरु केला आहे.
यंदाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच अधिक उष्णता जाणवण्यास सुुरुवात झाली होती. त्यामुळे उन्हाळा असह्य होणार आणि पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार असे नागरिक, प्रशासनाने गृहित धरले होते. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. मात्र, रविराजा रौद्ररुप धारण केल्याने जलसाठ्यातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला. त्यामुळे एप्रिलपासून जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली. मे आणि जूनमध्ये टंचाईची तीव्रता आणखीन वाढली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात सूर्यनारायण जणू आग ओकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, १२ मे रोजी कमाल तापमान ४१.५ अं.से. पर्यंत पोहोचल्याची नोंद लातूरच्या गळीत धान्य संशोधन केंद्रात झाली आहे. त्या तुलनेत सध्या उन्हाचा पारा उतरला असला तरी दुपारी १२ ते ४ वा. पर्यंत उन्हाचे चटके नेहमीप्रमाणे जाणवत आहेत. त्यामुळे जीवाची घालमेल होत आहे.
अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक टंचाई...जिल्ह्यातील १०२ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाने अधिग्रहणाद्वारे ९० गावांना पाणीपुरवठा सुरु केला आहे. सर्वाधिक पाणीटंचाई अहमदपूर तालुक्यात जाणवत असून ३५ गावे व वाड्यांत अधिग्रहणे करण्यात आली आहेत. लातूर तालुक्यात ५, औसा- २६, निलंगा- ३, रेणापूर- ५, चाकूर- ६, उदगीर- ५, जळकोट तालुक्यातील ५ गावांत अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
अद्याप टँकर सुरु नाही...यंदा उन्हाची तीव्रता वाढली असल्याने टंचाईचे चटकेही वाढले आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्यापही टँकर सुरु झाले नाही. अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शिरुर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील एकाही गावात पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे ही दोन तालुके सध्या तरी टंचाईमुक्त आहेत, असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
१२ गावे तहानलेलीच...जिल्ह्यातील एकूण १०२ गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रशासनाकडून ९० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित १२ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. तात्काळ पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.
दिनांक किमान तापमान कमाल तापमान
१ जून २०.५ ४०.५२ जून २१.० ४१.०३ जून २०.५ ४०.०४ जून २०.५ ३९.५५ जून २०.५ ३९.०६ जून २०.० ३८.०७ जून २१.० ३९.५