लातूर : आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी म्हणून शुक्रवारपासून संप पुकारला आहे. त्याचा ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. शिवाय, आयुष्मान कार्ड काढण्याची गतीही मंदावली आहे.
ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका महत्त्वाचा घटक आहे. त्या आरोग्य क्षेत्रातील ७० ते ७२ प्रकारची विविध कामे करीत असतात. त्यात प्रामुख्याने गरोदर मातांची काळजी घेणे, बाळांचे लसीकरण करुन घेणे, प्रसूतीपश्चात जन्मजात बाळ व मातेच्या भेटी घेणे, मधुमेह, रक्तदाब तपासणी करुन घेणे, माता व किशोरवयीन मुलींच्या बैठका घेऊन आरोग्यविषयक माहिती देणे अशा प्रकारची विविध कामे करतात. याशिवाय, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजेनच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड काढण्याचे काम करतात.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट देण्यात यावी, मोबदल्यात वाढ करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने गत ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. तेव्हा राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिवाळी भेट, मोबदल्यात वाढ करण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, अद्यापही आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.
आता दररोज १२०० आयुष्मान कार्ड...आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्ड काढण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ५ लाख २५ हजार कार्ड काढण्यात आले आहेत. आशा स्वयंसेविकांच्या मदतीने दररोज जवळपास ५ ते ६ हजार कार्ड काढण्यात येत होते. मात्र, आंदोलनामुळे १ हजार २०० कार्ड काढले जात आहेत. कार्ड काढण्याची गती मंदावली आहे.
मागण्यांची पूर्तता करावी...राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी शुक्रवारपासून संप पुकारला आहे. आश्वासनपूर्ती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे कृती समितीचे भगवान देशमुख यांनी सांगितले.