लातूर : पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बसची सोय केली असून मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून यात्रा स्पेशल बस बुधवारी रवाना झाल्या आहेत. जवळपास एक हजार २५० बस वारकऱ्यांच्या पंढरपूर वारीसाठी सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती आषाढी यात्रा मराठवाडा समन्वयक अभय देशमुख यांनी दिली. दरम्यान, लातूर बसस्थानकातून बुधवारी सकाळी २७ बस वारकऱ्यांना घेऊन पंढरपूर दर्शनासाठी रवाना झाल्या.
वारकऱ्यांची पंढरपूर दर्शनाची सोय व्हावी. त्यांची वारी सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यातून यात्रा स्पेशल बस सोडल्या आहेत. लातूर जिल्ह्यातून १२५ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. धाराशिव येथूनही १९० बस सोडण्यात आल्या असून नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक २५० बस वारकऱ्यांच्या दिमतीला आहेत. परभणी जिल्ह्यातून २२०, बीड येथून १६०, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १३५ आणि जिल्ह्यातून १७० अशा एकूण १,२५० बस वारकऱ्यांच्या सेवेत आहेत. ३ जुलै पर्यंत महामंडळाकडून ही सेवा दिली जाणार आहे.
लातूर बसस्थानकातून २७ बस रवाना.....!बुधवारी सकाळी लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकातून २७ बस आषाढी यात्रेसाठी रवाना झाल्या. एका बसमध्ये ४४ वारकरी असे एकूण १,१८८ वारकरी आषाढी यात्रेला लातूर येथून रवाना झाले. उद्या आषाढीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाला हे वारकरी पोहोचणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता सत्संग प्रतिष्ठानच्या वतीनेही वारकऱ्यांना मोफत आषाढी यात्रा घडविण्यात आली. दरवर्षी सत्संग प्रतिष्ठानचा हा उपक्रम असतो. यंदाही या प्रतिष्ठानने वारकऱ्यांना मोफत बसची सोय करून पंढरपूर यात्रा घडवली.
लातूरच्या विभागीय वाहतूक निरीक्षकांवर मराठवाड्याची जबाबदारी...मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातून वारकऱ्यांना घेऊन आलेल्या बस आणि वाहतूक, चालकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी लातूरचे विभागीय वाहतूक निरीक्षक अभय देशमुख यांच्यावर आहे. ते गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूरमध्ये मराठवाड्यातून येणाऱ्या बसचे नियोजन करीत आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत बाराशे पन्नास बस मराठवाड्यातून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत.