लातूर : राज्यात प्रादेशिक परिवहन विभागातील सहाय्यक अधिकाऱ्यांना (गट अ) सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी म्हणून अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ११ जणांना अखेर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. लातूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कोकण विभागात कल्याण येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदोन्नती झाली आहे.
राज्यात परिवहन विभागात पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे २५ मे २००४ च्या सेवा ज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत ७ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सुचनांनुसार मान्यता देण्यात येत आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या आधीन राहून पदोन्नतीला सहमती देण्यात येत असल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे. ज्यांना पदोन्नती देण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्यांना संबंधित कार्यालय प्रमुखांनी तत्काळ कार्यमुक्त करावे तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार कार्यालय प्रमुखांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून कार्यमुक्त होऊन आपला कार्यभार स्विकारावा, असे ६ जून रोजी काढण्यात आलेल्या आदेशात परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी म्हटले आहे.
यांना मिळाली पदोन्नती...
सहाय्यक प्रादेशिक परिवहन म्हणून कार्यरत असलेले राहुल जाधव यांना पिंपरी चिंचवड, विजय पाटील यांना सोलापूर, स्वप्नील भोसले यांना पुणे, आशुतोष बारकुल यांना कल्याण, अनंत भोसले यांना परिवहन आयुक्त कार्यालय, विजय काळे यांना सिंधुदुर्ग, प्रशांत देशमुख यांना यवतमाळ, रोहित काटकर यांना ठाणे, समरीन सय्यद यांना मुंबई (मध्य), स्नेहा मेढे यांना वर्धा तर अनंता जोशी यांना श्रीरामपूर येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे.